अनेक कंपन्यांतील कर्मचाऱ्यांचे मत

मुंबई : टाळेबंदीच्या काळात अनेक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचे ‘घरून काम’ सुरू असले तरी संगणकांचा तुटवडा, नेटवर्क, खंडीत वीजपुरवठय़ाची समस्या यामुळे ते खर्चिक व वारंवार व्यत्यय आणणारे ठरते आहे. संगणकाचा तुटवडा असल्याने अनेकांना कार्यालयातील संगणक घरी घेऊन यावे लागले. त्यामुळे कंपनीच्या सव्‍‌र्हरवरही कमालीचा ताण पडत आहे. त्यात घरातील कामे, नातलगांचा गोंधळ, वारंवार खंडीत होणारा वीजपुरवठा यामुळे कामात व्यत्यय निर्माण होत असल्याचे मत कर्मचारी व्यक्त करत आहेत.

करोनामुळे सुरक्षेच्या कारणास्तव गेल्या आठवडय़ापासून काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची सुविधा दिली. घरून काम करण्याच्या संकल्पनेत इंटरनेटद्वारे संगणक अथवा लॅपटॉप कंपनीच्या संगणक प्रणालीसोबत जोडण्यात येतो. यात घरून काम करण्यासाठी काही कंपनी विशेष सॉफ्टवेअर आणि अ‍ॅप्सची मदत घेत आहे. घरून काम करण्याची संकल्पना जुनी असली तरीही करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे मोठय़ा प्रमाणावर कर्मचारी घरून काम करत आहेत.

काहींना लॅपटॉप घरी वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र एकाचवेळी सर्व कर्मचारी बाहेरून काम करत असल्याने संगणकांचा तुटवडा जाणवत आहे. कर्मचाऱ्यांकडे स्वत:चा लॅपटॉप नसल्यास भाडेतत्वावर संगणकोची सोयही उपलब्ध करून दिली जात आहे. मात्र, कंपनी प्रशासनाला त्याचा खर्च करावा लागत असल्याने वर्क फ्रॉम होम खर्चिक असल्याचे मंदार भिडे यांने सांगितले. एकाच वेळी कर्मचारी घरी काम करत असल्याने सव्‍‌र्हरवर जास्तीचा ताण पडत आहे. हे टाळण्यासाठी थोडय़ाफार फरकाने बैठका आयोजित केल्या जात आहेत. घरी काम करताना वीजपुरवठा अथवा इंटरनेट खंडीत झाल्यास कामात व्यत्यय येत आहे. त्याचबरोबर घरातील होणाऱ्या गडबड गोंधळामुळे सलग काम होत नसल्याचे मत केदार रानडे व्यक्त करतो.

विशेष अ‍ॅपव्दारे कामकाजावर नियंत्रण

काही कं पन्यांनी घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे मापन करण्यासाठी विशेष अ‍ॅप तयार के ले आहेत. या अ‍ॅपवर काम करण्याचा कालावधी आणि करत असलेल्या कामाची नोंद केली जाते, असे हर्षदा जोशी हिने सांगितले. बहुतांश कंपन्या संवाद साधण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप, गुगल हँग आऊट्स, डियो, स्काईप याचा उपयोग करत आहेत. तर रिमोट कॉन्फरन्सिंग करण्यासाठी वेबेक्स, झूम, ब्लयू जीन्स या अ‍ॅपचा उपयोग केला जात आहे.