* अंधेरी-जोगेश्वरीदरम्यानची अतिक्रमणे दूर * गोरेगाव व राम मंदिर स्थानकांमध्ये कामे

मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून हार्बर मार्गाने अंधेरीपर्यंत जाणाऱ्या गाडय़ा गोरेगावपर्यंत नेण्यासाठीच्या कामांना वेग आला असून अंधेरी ते गोरेगाव यांदरम्यानचे हार्बर मार्गाचे विस्तारीकरण मार्च अखेरीपर्यंत पूर्ण होणार आहे. या मार्गात जोगेश्वरी येथील काही बांधकामांचा अडथळा येत होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना त्यावर रेल्वेच्या बाजूने तोडगा काढण्यात आला आणि या मार्गाच्या बांधकामातील मोठा अडथळा हटला आहे. त्यामुळे आता अंधेरी ते जोगेश्वरी यांदरम्यान रेल्वेरूळ टाकणे, जोगेश्वरी, राम मंदिर आणि गोरेगाव या ठिकाणी स्थानकांमध्ये बदल करणे आदी कामे सुरू करण्यात आली आहेत.

हार्बर मार्गावरील गाडय़ा मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून अंधेरीपर्यंत येतात. या गाडय़ा बोरिवलीपर्यंत चालवण्यात याव्या, अशी मागणी प्रवाशांकडून सातत्याने होत होती. या मागणीचा विचार करून रेल्वेने सुरुवातीला हार्बर मार्गाचे विस्तारीकरण गोरेगावपर्यंत करण्याचे निश्चित केले. या कामाचा समावेश एमयूटीपी-२ या योजनेत करण्यात आल्यानंतर या कामाला गती मिळाली. पण जोगेश्वरी स्थानकाच्या दक्षिणेकडे असलेल्या काही बांधकामांमुळे हा विस्तार रखडला होता.

जोगेश्वरी येथे असलेल्या दारूच्या गुत्त्याच्या मालकाने न्यायालयात धाव घेत त्याचे बांधकाम वाचवण्याचा प्रयत्न केला होता. हे प्रकरण गेली दीड वर्षे न्यायप्रविष्ट असल्याने या दरम्यान हा प्रकल्प पूर्ण होण्याच्या अनेक कालमर्यादा हुकल्या होत्या. आता हे प्रकरण सुटले असून रेल्वेच्या बाजूने निकाल लागला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अंधेरी ते जोगेश्वरी यांदरम्यानच्या कामांना वेग आला आहे.

जोगेश्वरी ते गोरेगाव या टप्प्यात या मार्गावर रेल्वेरूळ टाकण्याचे काम झाले आहे. आता अंधेरी ते जोगेश्वरी यांदरम्यान रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर आदी कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात आल्याचे मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांनी सांगितले. हा मार्ग जोगेश्वरीच्या पुढे नेण्यासाठी जोगेश्वरी पश्चिमेकडे असलेला प्लॅटफॉर्म क्रमांक एक थोडासा तोडावा लागणार आहे. सध्या हा प्लॅटफॉर्म ‘होम प्लॅटफॉर्म’ आहे. पण हार्बर मार्गाचे विस्तारीकरण झाल्यानंतर हा प्लॅटफॉर्म जोगेश्वरी पश्चिमेपासून तुटणार आहे.

या कामासह राम मंदिर, जोगेश्वरी (विस्तारित) व गोरेगाव या स्थानकांमध्ये हार्बरच्या प्लॅटफॉर्मची कामेही हाती घेण्यात आली आहेत. ही सर्व कामे मार्च अखेपर्यंत पूर्ण करण्यात येतील. त्यानंतर पश्चिम व मध्य रेल्वे या मार्गावर गाडय़ा सुरू करण्याबाबत निर्णय घेईल, असेही सहाय यांनी स्पष्ट केले.