तब्बल आठ महिने झाले तरी अद्याप मेट्रो ३ च्या आरेमधील कारशेडच्या बांधकामाची स्थगिती राज्य शासनाने हटवलेली नाही. या संदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतरदेखील याबाबत फारशा हालचाली झाल्याचे दिसत नाही. परिणामी प्रत्येक दिवसाला मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या मेट्रो ३ प्रकल्पास सुमारे चार कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचे समजते.

अनेक आंदोलनानंतरही वृक्ष प्राधिकरणाची परवानगी मिळाल्यानंतर अतिशय घाईगडबडीत ४ ऑक्टोंबरच्या रात्रीच २,१४१ झाडे तोडण्यात आली. शिवसेनेने आरेबाबत ठोस पावले उचलली जातील असे आश्वासन दिले होते. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आलेल्या नवीन सरकारने ताबडतोब २९ नोव्हेंबरला कारशेडच्या कामास स्थगिती देऊन, कारशेडसाठी अन्य जागेचा पर्याय शोधण्यासाठी समिती नेमली.

या समितीने, कारशेड आरेमध्ये होऊ शकते अन्य पर्याय अव्यवहार्य आहेत असा अहवाल जानेवारीच्या अखेरीस दिला. त्यानंतर अद्यापही या अहवालावर पुढे फारशी हालचाल झाली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या संदर्भातील निर्णय आता मुख्य सचिवांच्या पातळीवर असल्याचे समजते. अहवाल दाखल झाल्यानंतर अद्याप याबाबत नगरविकास विभागास अथवा एमएमआरसीला कोणतेही आदेश, सुचना प्राप्त झाला नसल्याचे माहिती मिळते. दरम्यान मार्चच्या मध्यावर करोनाचे संकट कोसळल्यावर इतर अनेक बाबींची प्राथमिकता साहजिकच मागे पडली आहे.

या प्रकल्पातील सीप्झ ते वांद्रे-कुर्ला संकुल हा पहिला टप्पा डिसेबर २०२१ पर्यंत, तर दुसरा टप्पा वांद्रे-कुर्ला संकुल ते कुलाबा जून २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. दरम्यान भुयारीकरणाचे सुमारे ८३ टक्के काम आत्तापर्यंत पूर्ण झाले आहे. कारशेडचे काम पूर्ण होण्यास विलंब लागणार असल्याने इतर कामे पूर्ण झाली तरी प्रकल्प रखडू शकतो. याबाबत एमएमआरसीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

कुलाबा ते सीप्झ या ३३ किमीच्या संपूर्ण भुयारी मार्गाच्या कामास २०१५ च्या दरम्यान सुरुवात झाली. एकूण २६ भुयारी स्थानके असलेल्या या मार्गाची कारशेड आरेमधील ३३ हेक्टर जागेवर प्रस्तावित होती. मात्र त्यास विरोध करणाऱ्या पर्यावरणप्रेमींचे जन आंदोलन चार वर्षांपासून सुरू आहे. दरम्यान २०१६ मध्ये आरे दुग्धवसाहत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या भोवतीचे पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील क्षेत्र म्हणून केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने जाहीर केली. त्यापूर्वीच कारशेडसाठीची जागा संवेदनशील क्षेत्रातून वगळण्यात आली.

नुकसान किती?

अगदी सुरुवातीच्या काळात कारशेडला होणार विरोध, एकूण प्रकल्पावर होणारा परिणाम यानुसार दिवसाला सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागत होते. तर वर्षभरापूर्वी हा नुकसानीचा आकडा दिवसाला चार कोटी पर्यंत पोहचला. सध्या नुकसानीचे परिक्षण करण्यात येत असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. आत्तापर्यंत कारशेडचे २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. नुकसान किती झाले याबाबत एमएमआरसीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.