‘मुंबई-दिल्ली ग्रीन वे’चे काम लवकरच सुरू होईल तर बद्रिनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री या श्रद्धास्थळांना जोडणाऱ्या मार्गाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण होईल, असा विश्वास शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. एसआयईएस संस्थेतर्फे दिला जाणारा ‘श्री. चंद्रशेखरेंद्र सरस्वती नॅशनल एमिनन्स’ पुरस्कार गडकरी यांना प्रदान करण्यात आला. माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात पुरस्कार सोहळा पार पडला. राष्ट्रीय व सामजिक स्तरावर कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रांतील नामांकित व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित केले जाते.

गडकरी यांनी गंगा शुद्धीकरण आणि वाराणसी ते बंगालपर्यंत तयार केलेल्या जलमार्गाबाबत माहिती दिली. पिठोरागड ते मानसरोवर या स्वप्नवत वाटणाऱ्या रस्त्याचे सत्तर टक्के काम पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. शनिवारी गडकरी यांच्यासह महावीर विकलांग साहाय्यता समितीचे संस्थापक डॉ. डी. आर. मेहता, ज्येष्ठ विज्ञान संशोधिका डॉ. मंजू शर्मा, आचार्य महामंडलेश्वर स्वामी अद्वैतानंद गिरी, चीन येथे संस्कृत भाषेचा आणि भारतीय संस्कृतीचा प्रचार-प्रसार करणारे प्रा. बाओशेंग आदी मान्यवरांनादेखील  ‘श्री. चंद्रशेखरेंद्र सरस्वती नॅशनल एमिनन्स’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एसआयईएस संस्थेचे अध्यक्ष डॉ. व्ही. शंकर यांच्या हस्ते पुरस्कार सोहळा पार पडला.