कांजूरच्या प्रादेशिक लस भांडाराचे काम अपूर्ण; परळच्या आरोग्य विभागात लस कुप्यांची साठवणूक करण्याचा निर्णय

करोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यासाठी ‘कोविशिल्ड’ लशीच्या कुप्या मंगळवारी प्राप्त झाल्या असून येत्या दोन दिवसांत मुंबईला पुरवठा केला जाणार आहे. परंतु मुंबईतील लशींच्या साठवणुकीसाठी निश्चित करण्यात आलेल्या कांजूरमार्ग येथील मोठय़ा शीतगृहाचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने परळ येथील पालिका आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यालयात लशीची साठवणूक करण्यात येणार आहे.

मुंबईत लशींच्या साठवणुकीसाठी कांजूर येथील पालिकेच्या इमारतीच्या  पहिल्या मजल्यावरील पाच हजार चौरस फूट जागेवर प्रादेशिक लस साठवणूक केंद्र उभारण्यात येत आहे.  यासाठी शीतगृहापासून आवश्यक  सुविधा करण्याचे काम डिसेंबरमध्ये सुरू झाले. दोन दिवसांपूर्वीच पालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे काम पूर्ण झाल्याचा व केंद्र मंगळवारपासून कार्यान्वित होण्याचा दावा केला होता. मात्र, प्रत्यक्षात येथील कामे सुरूच असल्याचे आढळून आले आहे.

दुरुस्तीकामे पूर्ण न झाल्याने आरोग्य विभागाने आता लशींचा साठा परळ येथील आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यालयात करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत एक लाख ३० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी को-विन अ‍ॅपवर झालेली आहे. परळच्या आरोग्य विभागाच्या कार्यालयात शीतपेटय़ा उपलब्ध असून सुमारे अडीच ते तीन लाख कुप्या साठवता येतील. त्यामुळे साठवणुकीची अडचण राहणार नाही, अशी माहिती पालिकेच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

सुरक्षिततेबाबत साशंकता

कांजूर येथील लस साठवणूक केंद्रात पालिकेच्या अधिकाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. तसेच पुरवठा करणाऱ्यांना योग्य नोंदणी करून लशीचा साठा दिला जाईल. येथे सुरक्षा रक्षकांसह सर्व व्यवस्था करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. याउलट परळ येथील केंद्रामध्ये आतापर्यंत अशी कोणतीही कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आलेली नाही. या केंद्रामध्ये सर्वसामान्यांची वर्दळ असते. तसेच या इमारतीत अन्य विभागांची कार्यालयेही आहेत. त्यामुळे परळ येथील साठवणूक केंद्राच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत.