करोनाकाळातील नालेसफाईसाठी आधीच्याच वर्षांतील कंत्राटदारांना कामे देण्यात आल्याची कबुली पालिका प्रशासनाने दिली आहे. टाळेबंदीमुळे कामगार मिळत नसल्यामुळे परस्पर जुन्याच कंत्राटदारांना मुदतवाढ देण्यात आली होती. याबाबतचा प्रस्ताव आता कंत्राट कालावधी संपत आलेला असताना प्रशासनाने स्थायी समितीसमोर आणला आहे.  करोनाकाळात ११३ टक्के  नालेसफाई झाल्याचा दावा पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी के ला होता. मात्र तरीही अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना घडल्या होत्या.

नालेसफाईच्या कामांवरून पालिकेला दरवर्षी टीके ला सामोरे जावे लागते. गेल्यावर्षी नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा पालिका आयुक्तांनी केला होता. मात्र तरीही मुंबईत अनेक ठिकाणी पाणी आठ ते दहा तास साचून राहिले होते. त्यामुळे नालेसफाई झाली की नाही, असा सवाल उपस्थित झाला होता. मात्र नालेसफाईसाठी कंत्राटदार पुढे न आल्यामुळे आधीच्याच कंत्राटदारांच्या नेमणुका केल्याची माहिती प्रशासनाने स्थायी समितीला दिली आहे. २०१९-२० मध्ये या कामासाठी ४६ कोटी ५० लाख रुपये मोजले होते. त्या कामासाठी २०२०-२१ साठी ४७ कोटी ७ लाखाचे कंत्राट देण्यात आले. कंत्राट संपत आलेले असताना आता याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आला आहे.

एप्रिलपासून नालेसफाईची कामे सुरू करावी लागत असल्यामुळे त्यासाठीची निविदा प्रक्रिया आधीच म्हणजे डिसेंबरपासूनच राबवावी लागते. एप्रिल २०२० पासून सुरू होणाऱ्या नालेसफाईसाठी डिसेंबर २०१९ मध्ये निविदा मागवण्यात आल्या होत्या. मात्र पश्चिम उपनगरातील नऊ छोटय़ा नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी कोणीही कंत्राटदार पुढे आले नाहीत. त्यानंतर पालिकेने अशासकीय संस्थांच्या कामागारांकडून नालेसफाई करून घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांनीही करोनामुळे काम करण्यास असमर्थता दर्शवली. अखेरीस गेल्या वर्षी नालेसफाईसाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदारांकडून हे काम करण्याचे प्रशासनाने ठरवले. नालेसफाईचे काम तीन टप्प्यांत वर्षभर चालते. शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू असताना आलेल्या या प्रस्तावावर स्थायी समितीचे सदस्य काय निर्णय घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

कामे अशी केली

*  १ एप्रिल ते ३० जून २०२० या कालावधीत पावसाळापूर्व नालेसफाईत ७० टक्के  गाळ काढण्यात आला.

*   १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीत पावसाळ्यातील १५ टक्के  गाळ काढण्यात आला.

*   १ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत तिसऱ्या टप्प्यात १५ टक्के  गाळ काढणे अपेक्षित असून त्यापैकी ७ टक्के  गाळ काढला असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.