News Flash

पर्यटन कंपन्यांकडून ‘वर्केशन’ पॅकेज

पर्यटनस्थळी काम करता करता सुट्टीचा आनंद

पर्यटनस्थळी काम करता करता सुट्टीचा आनंद; लोणावळा, खोपोली, दापोली, नाशिकला प्राधान्य

सुहास जोशी, लोकसत्ता 

मुंबई : राज्यात ई-पासशिवाय वाहतूक आणि हॉटेलना पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास मुभा दिल्यानंतर पर्यटन कंपन्यांनी नजीकच्या पर्यटनस्थळांसाठी विशेष योजना राबवत ग्राहकांना आकर्षित करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये सुट्टी आणि काम करण्याच्या सर्व सुविधा देणारी ‘वर्केशन’ ही संकल्पना वापरली जात आहे.

देशभरात शिथिलीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ज्या राज्यात वाहतूक आणि हॉटेलच्या सुविधांना परवानगी मिळाली, तिथे ही संकल्पना गेल्या दीड महिन्यात वापरण्यात आली. राज्यातील निर्बंधांमुळे त्याबाबत फारसा प्रयत्न झाला नाही. मात्र सप्टेंबरमध्ये या संकल्पनेवर आधारित विशेष योजना आघाडीच्या पर्यटन कंपन्यांकडून कार्यरत होत आहेत.

घरात बसून काम करण्याने आलेल्या कंटाळ्यावर उपाय म्हणून ‘वर्केशन’ योजनांचा वापर होत आहे. यामध्ये एखाद्या रिसॉर्ट अथवा हॉटेलमध्ये राहणे, दिवसभर कामासाठी स्वतंत्र जागा, वायफाय सुविधा आणि उर्वरित वेळात सुट्टीचा आनंद अशी जोड दिली जाते. विशेष म्हणजे यामध्ये सध्या स्पर्धा दिसत असून अगदी सात हजारांपासून ते ३० हजार रुपयांपर्यंतच्या योजनांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय प्रवासावरील बंधने आणि मर्यादित देशांतर्गत हवाई प्रवासाची सुविधा यांमुळे शहरानजीक, स्वत:च्या गाडीने पोहोचता येईल इतक्या अंतरासाठी अशी सुविधा देण्याकडे कल असल्याचे दिसते. ‘अशा प्रकारच्या सहलीची चौकशी ग्राहकांकडून होत असून, दोन ते चार दिवसांसाठी अशी पॅकेज तयार करण्यात येत आहे,’ असे केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ यांनी सांगितले. सप्टेंबरनंतरच्या काळाबाबत जरी अनिश्चितता असली तरी विमान कंपन्या, हॉटेल यांच्याकडून खूप लवचीक धोरण स्वीकारले जात असून अगदी शेवटच्या क्षणी सहल रद्द केली तरी पैसे परत मिळायची खात्री दिली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

अशा योजनांमध्ये सर्व प्रकारचे आरोग्य सुरक्षा उपाय तसेच आरोग्य विमा वगैरे सुविधांचाही समावेश आहे. हॉटेल, विमा कंपन्यांकडून त्यासंदर्भात पूर्ण सहकार्य असल्याने सहलीच्या एकूण खर्चात अजिबात वाढ झाली नसल्याचे थॉमस कुकचे अध्यक्ष राजीव काळे यांनी सांगितले.

सप्टेंबर महिन्यासाठी नजीकच्या पर्यटन ठिकाणी काम आणि सुट्टीचा आनंद या संकल्पनेकडे ग्राहकांचा कल झुकत असून त्यास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे एसओटीसीचे अध्यक्ष डॅनिअल डिसूजा यांनी सांगितले. यामध्ये लोणावळा, नाशिक, खोपोली, दापोली अशा ठिकाणांना अधिक प्राधान्य मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.  एरवी केवळ सभासदांसाठीच प्रवेश असलेल्या क्लब महिंद्राच्या रिसॉर्टवर सध्या सभासद नसलेल्यांसाठीही ‘वर्केशन’ सुविधा देण्यात येत आहे. ‘सध्या राज्यातील क्लबच्या रिसॉर्टना ८५ टक्के प्रतिसाद मिळत असल्याचे क्लब महिंद्राचे मुख्य संचालन अधिकारी विवेक खन्ना यांनी सांगितले.

मुंबईतल्या मुंबईत सुट्टी

एरवी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याचा खर्च अवाच्या सव्वा असला तरी सध्या यातील काही हॉटेलनी आकर्षक सवलत दरात राहण्याची आणि कामाची सुविधा देणारी पॅकेजेस तयार केली आहेत. पाच महिने घरीच बसून कामाने कंटाळलेल्यांसाठी ‘वर्केशन’मध्ये मुंबईतल्यादेखील तीन हॉटेलचा समावेश असल्याचे थॉमस कूकचे राजीव काळे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2020 11:53 pm

Web Title: workation package from tourism companies zws 70
Next Stories
1 ड्रग प्रकरणी NCB ने कंगनाची स्वतःहून चौकशी करावी – सचिन सावंत
2 चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना अटक, ईडीची कारवाई
3 कंगना तर ‘नॉटी गर्ल’, संजय राऊत यांचं वक्तव्य, उलगडला हरामखोर शब्दाचा अर्थ
Just Now!
X