विसर्जन मिरवणुकीत ध्वनिक्षेपक बंद करण्यास सांगितल्याने संतप्त झालेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांवरच हल्ला केला. या मारहाणीत महिला पोलीस निरीक्षकासह दोन पोलीस जखमी झाले आहेत. कांदिवली येथे बुधवारी रात्री ही घटना घडली. समता नगर पोलिसांनी याप्रकरणी आठ महिलांसह पंधरा जणांना अटक केली आहे.

कांदिवलीच्या नवतरुण मित्र मंडळाच्या सात दिवसांच्या गणेशाची विसर्जन मिरवणूक बुधवारी रात्री निघाली होती. रात्री साडेदहाच्या सुमारास मंडळाची विसर्जन मिरवणूक पश्चिम द्रुतगती महामार्गावरून जात होती. परंतु मिरवणुकीत मोठय़ा आवाजात ध्वनिक्षेपक सुरू होता. पोलीस उपनिरीक्षक सतीश वायळ आणि पोलीस कर्मचारी धोबी यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना ध्वनिक्षेपक बंद करण्यास सांगितले. त्यावरून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालत बाचाबाची सुरू केली. हा प्रकार पाहून महिला पोलीस निरीक्षक सुनयना नटे घटनास्थळी गेल्या. मात्र जमावाने या तिघा पोलिसांना मारहाण केली. यानंतर अधिक पोलीस कुमक मागविण्यात आली आणि सौम्य लाठीमार करून जमावाला आटोक्यात आणण्यात आले. तिघा जखमी पोलिसांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी समता नगर पोलिसांनी पोलिसांना मारहाण करणाऱ्या आठ महिलांसह पंधरा जणांना अटक केली. त्यांना २६ सप्टेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.