घरी परतण्याच्या अर्जासाठी मजुरांची शहरांत झुंबड; साथसोवळ्याच्या नियमांचा विसर

टाळेबंदीमुळे विविध भागांत अडकून पडलेले मजूर, यात्रेकरू, विद्यार्थी, पर्यटक यांना आपापल्या राज्यात परतण्यासाठी विशेष रेल्वे गाडय़ांची व्यवस्था करण्यात आल्याचा परिणाम मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि राज्यातील काही भागांत नव्या गर्दी आणि गोंधळात दिसून आला. अर्ज मिळाल्यानंतर ते भरण्यापासून परवानगीपत्रासाठी विविध पोलीस ठाण्यांबाहेर मजुरांचा जथा दिसून येत होता.

वेगवेगळ्या शहरांमध्ये अडकून पडलेले मजूर तसेच परप्रांतीयांनी पोलीस तसेच महापालिका कार्यालयांभोवती शनिवारी सकाळपासून गराडा घातला. परराज्यात जाऊ इच्छिणाऱ्यांनी यासाठी ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन पोलिसांनी केले. मात्र ठाणे जिल्ह्य़ातील भाजप नेत्यांनी मजुरांचे अर्ज भरून घेण्यासाठी अनेक ठिकाणी शिबिरे भरविली. त्यामुळे साथसोहळ्याचा नियम पूर्णपणे उधळला गेला.

अवघ्या काही तासांत शेकडो अर्ज जमा झाले असून ते पोलीस ठाण्यात जमा करण्यात येणार असल्याचे दिव्यातील भाजपच्या शिबीर आयोजकांकडून सांगण्यात आले. येथे केवळ नाव, पत्ता, आधारकार्ड क्रमांक आणि गावचा पत्ता अशी माहिती नोंदवून घेण्यात येत होती. त्यामध्ये कोकणात जाणाऱ्या काही मंडळींनी अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती. भिवंडीतील अनेक भागांत असेच चित्र होते. हजारो मजुरांनी कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या मुख्यालयाबाहेर गर्दी केली होती. त्या शेजारी भाजप शहराध्यक्ष संजय भोईर यांनीही अर्ज वाटप सुरू केले. पालिका मुख्यालयाबाहेर झालेली गर्दी कमी करण्यासाठी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी विचारणा केली होती. त्यांच्या परवानगीनंतर त्यांच्याकडूनच अर्ज घेऊ न सामाजिक अंतर पाळून मी त्यांचे वाटप केले, असे त्यांनी सांगितले.

करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वच नागरिकांनी शासनाने दिलेले नियम पाळणे आवश्यक आहे. लोकप्रतिनिधी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी गर्दी करून अर्ज भरण्याचे कार्यक्रम राबविल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात.

– प्रवीण पवार, अपर पोलीस आयुक्त, ठाणे पोलीस.

दिवा भागातील कार्यकर्त्यांना स्थानिक पोलिसांनी विनंती केली होती. त्यानुसार परराज्यातील मजुरांचे अर्ज भरण्याचा उपक्रम राबविण्यात आला. मात्र दुपारनंतर गर्दी वाढताच कार्यकर्त्यांनी पोलिसांना ही बाब सांगितली आणि काही वेळानंतर हा उपक्रम थांबविला.

– निरंजन डावखरे, भाजप, ठाणे शहराध्यक्ष

भिवंडीतील १२०० मजूर उत्तर प्रदेशच्या दिशेने

भिवंडीत मोठय़ा प्रमाणात हातमाग कामगार असून टाळेबंदीमुळे हे कामगार भिवंडीत अडकले आहेत. त्यामुळे यातील १२०० कामगारांना रेल्वेने उत्तर प्रदेशात सोडण्यात येणार होते. भिवंडीतील सहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस कर्मचाऱ्यांकडून मजुरांची माहिती गोळा करण्यात आली होती. त्यानंतर, उत्तर प्रदेशातून आलेल्या या १२०० मजुरांची नोंदणी करण्यात आली. या मजुरांना रेल्वेने पाठविण्याचा निर्णय पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने घेतला असून त्यासाठी त्यांना शनिवारी सायंकाळी भिवंडीतील काही मैदानात थांबविण्यात आले होते. रात्री गोरखपूरच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेने या मजुरांना पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती भिवंडी पोलिसांनी दिली.

झाले काय?

मुंबई, ठाणे जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या शहरांमध्ये मोठय़ा प्रमाणात परराज्यातील नागरिक वास्तव्य करतात. त्यापैकी अनेक जण रिक्षाचालक, मजुरी तसेच अन्य कामे करतात. केंद्र सरकार परगावी जाण्यासाठी रेल्वे

गाडय़ांची व्यवस्था करत असल्याचे वृत्त समजताच यापैकी हजारोंच्या संख्येने मजूर, कामगारांनी शनिवारी सकाळपासून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांवर गर्दी सुरू केली.

भाजप नेत्यांचा अतिउत्साह..

ठाणे जिल्ह्य़ातील एकटय़ा दिवा परिसरात सुमारे दीड लाखांहून अधिक परराज्यांतील नागरिक राहतात. या नागरिकांसाठी भाजप नेत्यांनी शुक्रवारी रात्रीपासून ‘अर्ज भरण्यासाठी संपर्क साधा’ आशा आशयाचे संदेश समाजमाध्यमावर प्रसारित केले. यामुळे शनिवारी सकाळी या परिसरात हजारोंच्या संख्येने नागरिक जमले. पोलीस आणि महापालिका प्रशासनाच्या विनंतीनुसार हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे स्पष्टीकरण भाजप नेत्यांनी दिले असले तरी लोकप्रतिनिधी किंवा सामाजिक कार्यकर्त्यांनी गर्दी करून अर्ज भरण्याचे कार्यक्रम राबविल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात, असे पोलिसांकडून सायंकाळी उशिरा सांगण्यात आले.

शंका आणि कुतूहल..

* अर्जाची झेरॉक्स करून किंवा स्वलिखित अर्ज दिला तरी तो स्वीकारला जाईल, असे प्रशासनाने आणि पोलिसांनी स्पष्ट केल्यानंतर मुंबई आणि उपनगरांत झेरॉक्सच्या दुकानाबाहेर झुंबड पाहायला मिळाली.

* नवी मुंबईत पोलीस चौक्यांवर अर्जाबाबत शंका विचारण्यास परप्रांतीय मजुरांची झुंबड उडाली. मुंबईत काही ठिकाणी गर्दीचा अतिरेक झाल्याने अर्जवाटप बंद करण्यात आले.

* अनेक ठिकाणी अर्जासह अर्जाबाबतचे कुतूहल आणि प्रश्न मिटल्यावर जमाव पांगला. तर काही ठिकाणी सौम्य बळाचा वापर करावा लागला.