यंत्रमाग कामगारांपैकी ‘कांजी’ (सायझिंग) कामगारांना ५०० रुपये अंतरिम वेतनवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे इचलकरंजीत गेले ४१ दिवस सुरु असलेला या कामगारांचा संप मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना सात हजार ९०० रुपये किमान वेतन आणि ही वाढ दिली जाईल. वेतनप्रश्नी निर्णय घेण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली असून एक महिन्यात ती राज्य सरकारला अहवाल सादर करणार असल्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार सुरेश हळवणकर यांनी पत्रकारांना सांगितले.
वेतनप्रश्नी कामगारांनी आंदोलन सुरु केल्याने इचलकरंजीला सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा फटका बसला असून एक लाख यंत्रमाग बंद पडले आहेत. हा वाद चिघळल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी वस्त्रोद्योगमंत्री पाटील यांच्याकडे झालेल्या बैठकीस खासदार राजू शेट्टीही उपस्थित होते. हे प्रकरण उच्च न्यायालयातही प्रलंबित असून न्यायालयाच्या निर्देशांनुसार पुढील कार्यवाही केली जाईल. तोपर्यंत उच्चस्तरीय समितीचाही अहवाल सरकारकडे येणार आहे. या कामगारांच्या वेतनवाढीला यंत्रमागमालकांचा विरोध आहे. त्यांनी उच्च न्यायालयात याचिकाही सादर केली आहे. पण आता अंतरिम वाढीचा निर्णय झाल्याने संप मागे घेण्यात येऊन यंत्रमाग पुन्हा सुरु होतील.