22 February 2019

News Flash

Video : मुंबई लोकलमध्ये असा रंगला वर्किंग वूमनचा गरबा

साधारणपणे २ मिनिटांच्या या व्हिडियोमध्ये गरबा खेळताना महिला अगदी दंग झाल्याचे दिसत आहे.

मुंबई शहराचा विस्तार मोठा असल्याने ऑफीसला जाण्यासाठी सर्वांनाच लोकलने प्रवास करणे क्रमप्राप्तच आहे. लोकल ही मुंबईची जीवनवाहीनी आहे. लोकलच्या या प्रवासातच महिलांचे दिवसातील साधारण २ ते ३ तास जातात. उपनगरात राहणाऱ्या महिलांना तर याहूनही अधिक वेळ प्रवासासाठी लागतो. घरच्या जबाबदाऱ्या, मुलांचे सगळे आणि त्यात नोकरी यामध्ये सणवार साजरे करताना या महिलांची खऱ्या अर्थाने तारांबळ होते. पण मुंबईतील महिलांनी यावर एक मार्ग शोधून काढला आहे. ऑफीस आणि घरानंतर सर्वाधिक वेळ जात असणाऱ्या या लोकलमध्येच महिलांनी गरबा खेळण्याचा घाट आतला. नवरात्रीत खेळला जाणारा गरबा खेळण्यासाठी वेळ नसल्याने त्यांनी ही अनोखी शक्कल लढवली. त्यामुळे मुंबईतील वर्किंग वूमनच्या धावपळीचे दर्शनच या व्हिडियोतून आपल्याला होताना दिसते.

ही लोकल सकाळी ९ वाजताची असून गोरेगावहून चर्चगेटला जाणारी होती. यामध्ये मध्यमवयीन महिला लोकलच्या डब्यात मध्यभागी असणाऱ्या रिकाम्या जागेत गरबा खेळताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या महिलांनी त्याचा व्हिडियोही काढला. साधारणपणे २ मिनिटांच्या या व्हिडियोमध्ये गरबा खेळताना महिला अगदी दंग झाल्याचे दिसत आहे. नवरात्रात महिला ९ दिवस ठराविक रंगाचे कपडे घालतात. यामध्ये दुसऱ्या दिवशी पिवळा रंग असताना या सगळ्या महिलांनी पिवळ्या रंगाच्या साड्या घातल्याचे दिसत आहे. ‘मै तो भूल गई बाबूल का देस’ या गाण्यावर महिलांनी फेर धरल्याचे दिसत आहे. यावेळी लोकलमध्ये उपस्थित असलेल्या सर्व महिलाही त्यांच्याकडे अतिशय कौतुकाने पाहत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे वेळेअभावी सणवार साजरे करता येत नसल्याचे दु:ख व्यक्त न करता या महिलांनी लोकलमध्ये गरबा खेळण्याचा शोधून काढलेला मार्ग नक्कीच कौतुकास्पद आहे.

First Published on October 12, 2018 2:54 pm

Web Title: working womens in mumbai playing navratri garba in train