16 February 2019

News Flash

‘मामी’मध्ये चित्रपट समीक्षकांसाठी कार्यशाळा

या उपक्रमात देशभरातून पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या १२९ नवोदित चित्रपट समीक्षकांनी सहभाग घेतला.

(संग्रहित छायाचित्र)

देशभरातून १२९ नव्या चित्रपट समीक्षकांचा सहभाग

मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हलतर्फे चित्रपट समीक्षेच्या क्षेत्रातील नव्या समीक्षकांचा शोध घेण्यासाठी, चित्रपटांविषयी लेखन करणाऱ्या नव्या लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी दोन दिवसीय ‘फिल्म क्रिटिक लॅब २०१८’ चे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात देशभरातून पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या १२९ नवोदित चित्रपट समीक्षकांनी सहभाग घेतला.

चित्रपट समीक्षेचा राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट समीक्षक बारव्दाज रंगन आणि लोकप्रिय चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा यांनी या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. चित्रपट समीक्षा कशी लिहावी, त्यासाठी कोणत्या गोष्टींवर भर देणे आवश्यक आहे, काळानुरूप समीक्षेचे बदलते स्वरूप, समीक्षेच्या क्षेत्रातील आव्हाने काय आहेत, समीक्षा करताना कोणती काळजी घ्यायची असते, समीक्षा करण्यासाठी समीक्षकाकडे कोणते गुण असणे आवश्यक आहेत, अशा अनेक प्रश्नांवर अनुपमा चोप्रा आणि बारव्दाज रंगन यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. कार्यशाळेत भारतभरातून उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या नव्या दमाच्या १२९ चित्रपट समीक्षकांमधून २० जणांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी चित्रपट समीक्षक बारव्दाज रंगन आणि काही ज्येष्ठ चित्रपट समीक्षकांची समिती नेमण्यात आली आहे. ही समिती कार्यशाळेत सहभागी झालेल्या १२९ विद्यार्थ्यांमधून २० जणांची निवड करणार आहे.

२५ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत आयोजन

२० वा मामी मुंबई फिल्म फेस्टिव्हल २५ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. नव्या चित्रपट समीक्षकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेविषयी चित्रपट समीक्षक आणि या कार्यशाळेच्या व्याख्यात्या, मार्गदर्शक अनुपमा चोप्रा यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले की, हा एक रोमांचक उपक्रम आहे, चित्रपट समीक्षेत चांगले समीक्षक यायला हवेत. त्यांच्या लेखनामुळे, त्यांच्या चित्रपटविषयक मतांमुळे चित्रपटांना दिशा मिळेल, चांगले चित्रपट बनू लागतील.

समीक्षेचा दर्जा उंचावेल. यासाठी मुंबई फिल्म फेस्टिव्हलने आयोजित केलेली ‘फिल्म क्रिटिक लॅब २०१८’ ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरली आहे.

First Published on August 16, 2018 2:36 am

Web Title: workshop for movie critics in mami