जागतिक स्पर्धेसाठी भारतीय स्पर्धकाची निवड

रोबो आणि विविध तंत्राविष्कार यांनी रंगणाऱ्या आयआयटी मुंबईतील तंत्रमहोत्सवात यंदा विशेष आकर्षण ठरणार आहे ते नवउद्योगांच्या विश्वचषकाचे. सॅनफ्रॅन्सिस्को येथे होणाऱ्या अंतिम फेरीत भारतातून कोणता नवउद्योग सहभागी होईल त्याची निवड या तंत्रमहोत्सवात होणार आहे. विजेत्याला अंतिम फेरीत दहा लाख अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक मिळवण्याची संधी मिळणार आहे.

देशभरातील तंत्रप्रेमींचे आकर्षण असलेल्या आयआयटी मुंबईचा तंत्रमहोत्सव २९ ते ३१ डिसेंबर या कालावधीत रंगणार आहे. यामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही तंत्राविष्कार अनुभवण्यास मिळणार आहे. तसेच विविध स्पर्धाचेही आयोजन करण्यात आले आहे. मात्र यंदा विशेष आकर्षण असणार आहे ते नवउद्योगांच्या विश्वचषकाचे. सॅनफ्रॅन्सिस्को येथील ‘फिनोक्स व्हेंचर कॅपिटल’ या कंपनीतर्फे या विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे. यातील भारतातील विभागीय फेरी या तंत्रमहोत्सवात पार पडणार आहे. यात निवड झालेला नवउद्योग मे २०१८ मध्ये सॅनफ्रॅन्सिस्को येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी जाऊ शकणार आहे. जगभरातील ३० स्पर्धकांमध्ये ही अंतिम फेरी रंगणार असून सर्वोत्तम नवउद्यमीला दहा लाख डॉलर्सची गुंतवणूक मिळवण्याची संधी मिळणार आहे. या स्पध्रेत सहभागी होण्यासाठी नवउद्यमींनी http://www.techfest.org/swcयेथे नोंदणी करायची आहे. या संकेतस्थळावर नियम व अटी देण्यात आल्या असून त्याची पूर्तता करणाऱ्या व आकर्षक कल्पना असलेल्या दहा नवउद्योगांना मुंबईत पार पडणाऱ्या विभागीय अंतिम फेरीत सहभागी होता येणार आहे. यातून एका नवउद्योगाची अंतिम फेरीसाठी निवड केली जाणार आहे. या वर्षीचा हा तंत्रमहोत्सव मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडिया, डिजिटल इंडिया या उपक्रमांना प्रोत्साहन देणारा असणार आहे. तसेच यामध्ये महिला सक्षमीकरणासाठी विशेष भर देण्यात आला आहे. याअंतर्गत देशभरातील ४० निमशहरे, शहरे आणि गावांमध्ये ४० लाख सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप केले जाणार आहे.

विभागीय फेऱ्या

तंत्रमहोत्सवात आयोजित केल्या जाणाऱ्या विविध स्पर्धाच्या विभागीय फेऱ्या यंदा मुंबई, जयपूर, हैद्राबाद, भोपाळ आणि भुवनेश्वर येथे पार पडणार आहे. या फेऱ्यांच्या दरम्यान सर्व विद्यार्थ्यांना विविध कार्यशाळा आणि विविध विषयांवर मार्गदर्शन करणाऱ्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धाच्या माहितीसाठी  http://www.techfest.org/ca या संकेतस्थळावर भेट द्या.