19 January 2018

News Flash

मरिन ड्राइव्हला ‘जागतिक वारसा’ नको!

मरिन ड्राइव्ह परिसरात ३७ इमारती असून त्यात १०४० फ्लॅटधारक आहेत.

प्रतिनिधी, मुंबई | Updated: September 9, 2017 3:41 AM

इमारतींच्या पुनर्विकासाला खीळ बसण्याची रहिवाशांना भीती

‘राणीचा रत्नहार’ अशी ओळख असलेल्या मुंबईच्या मरिन ड्राइव्हला पाहण्यासाठी देशविदेशातील पर्यटक भेटी देत असतात. सुमारे ६०-७० वर्षांपूर्वी विकसित झालेला हा परिसर जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्याच्या हालचाली सध्या सुरू झाल्या आहेत. मात्र, याला या परिसरातील इमारतींत राहणाऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. ‘जागतिक वारसा’ यादीत समावेश झाल्यास या परिसरातील जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासाला खीळ बसण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे. तसेच, ‘जागतिक वारसा’ म्हणून जाहीर करण्याचा प्रयत्न झाल्यास मरिन ड्राइव्ह बंद करण्याचा इशाराही रहिवाशांनी दिला आहे.

मरिन ड्राइव्ह परिसरात ३७ इमारती असून त्यात १०४० फ्लॅटधारक आहेत. मात्र या घरांमध्ये राहणाऱ्यांचा विचार न घेता या परिसराला जागतिक वारसाचा दर्जा देण्याची योजना नगरविकास विभागाने आखल्याचा आरोप येथील स्थानिकांनी केला आहे. या परिसराला जागतिक वारशाचा दर्जा मिळाल्यास येथील इमारतींच्या पुनर्विकासाला खीळ बसेल, अशी भीती येथील रहिवाशी व्यक्त करत आहेत.या भागातील बहुतांश इमारती १९४० ते १९५० काळात बांधल्या गेल्या आहेत. ६० ते ७० वर्षे जुन्या असलेल्या या इमारतींचा पुनर्विकास गरजेचा आहे. मात्र जागतिक वारशाचा दर्जा मिळाल्यास त्याला खीळ बसेल, असे रहिवाशांना वाटते. पूर्वी या परिसरात ३२ मीटपर्यंतच्या भागाला पुरातन वारशाचा दर्जा देण्यात आला होता. मात्र आता ते अंतर ५८ मीटपर्यंत वाढविण्यात आले आहे. आता या संपूर्ण परिसराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आम्हाला मोठा धक्काच बसणार आहे, असे येथील हरी निवास इमारतीतील रहिवाशी कनवल शहापुरी यांनी सांगितले.

५० ते ६० वर्षांपूर्वी घर घेतले तेव्हा एका घरात एक कुटुंब होते. मात्र आता कुटुंबाचा आकार वाढला आहे. त्यामुळे वाहनांच्या पार्किंगची समस्या भेडसावू लागली. इमारती जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना येथील इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव दिला होता. त्यावर अद्याप काहीच निर्णय झालेला नाही. आता जागतिक वारसा परिसराचा दर्जा मिळाल्यास आमच्या इमारतींचा पुनर्विकास कठीण होऊन बसेल, अशी भीती शहापुरी यांनी व्यक्त केली, तर ‘‘जागतिक वारसा देण्याबाबत ज्या काही हालचाली सुरू आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. येथील विकासाला यामुळे खीळ बसेल अशी भीती त्यांना आहे. मुळात जागतिक वारसा देण्याबाबतच्या नियमांमध्ये मरिन ड्राइव्ह परिसर मोडतच नाही. जागतिक वारशाचा दर्जा देण्याआधी रहिवाशांचे विचार जाणून घेणे गरजेचे आहे. माझाही पाठिंबा आहे. पालिका व नगरविकास खाते व स्थानिकांना अंधारात ठेवून हा निर्णय घेतल्याचा आरोप पुरोहित यांनी केला.

आंदोलनाचा इशारा

एकीकडे मुंबईला शांघाय बनविण्याची स्वप्ने दाखवली जातात आणि दुसरीकडे जागतिक दर्जा देऊन विकासच रोखून ठेवला जात आहे. ५० ते ६० वर्षे जुन्या इमारतींचा पुनर्विकास न झाल्यामुळे त्यांना धोका निर्माण झाला तर काय, असा सवाल स्थानिकांनी केला आहे. इमारत कोसळून मरण्यापेक्षा मरिन ड्राइव्ह परिसराला जागतिक दर्जा मिळाल्यास रस्त्यावर संपूर्ण कुटुंबासहित उतरून मरिन ड्राइव्ह बंद करू, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

मुंबई भेटीवर आलेल्या युनेस्कोच्या प्रतिनिधींसोबत शुक्रवारी मरिन ड्राइव्हला जागतिक वारसा परिसराचा दर्जा देण्याबाबत चर्चा करण्यात आली. या परिसराला पुरातन वारसा परिसराचा दर्जा आधीच देण्यात आला आहे. जर त्याला जागतिक दर्जा लागू झाल्यास त्यात नवीन बदल होणार नाहीत.  येत्या आठ दिवसांत स्थानिकांशी बोलून युनेस्को वर्ल्ड हेरिटेजचे प्रतिनिधी आपला अहवाल सादर करतील.

नितीन करीर, प्रधान सचिव, नगर विकास विभाग

मरिन ड्राइव्ह परिसराच्या पुनर्विकासाबाबत न्यायालयात सुनावणी सुरू आहे. गेल्या महिन्यात या परिसरासंबंधीचे धोरण पालिकेकडून सादर करण्यात आले. त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित असून न्यायालयाच्या निर्णयानुसार कार्यवाही केली जाईल.

अजोय मेहता, महापालिका आयुक्त

First Published on September 9, 2017 3:41 am

Web Title: world heritage issue marine drive
  1. No Comments.