चंद्राच्या पृष्ठभागावरील विवरांचे स्पष्ट निरीक्षणाची संधी मिळवण्यासाठी साजरा करण्यात येणारा जागतिक चंद्रमहोत्सव दिन शनिवारी, २० ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने मुंबई, ठाण्यासह विविध ठिकाणी खगोलप्रेमींसाठी चंद्र निरीक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

दर वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात सप्तमी-अष्टमी जवळच्या शनिवारी असा चंद्र निरीक्षणाचा महोत्सव आयोजित केला जातो. कारण सप्तमी-अष्टमीच्या दिवशी अर्धे चंद्रबिंब प्रकाशित असल्याने चंद्राच्या पृष्ठभागावरील विवरांचे चांगले निरीक्षण करता येते. या पाश्र्वभूमीवर ‘नासा प्लॅनेटरी सोसायटी ल्युनर अ‍ॅण्ड प्लॅनेटरी इन्स्टिटय़ूट’ने खगोलप्रेमींना चंद्रनिरीक्षणाचा आनंद घेण्याचे आवाहन केले आहे. मुंबईत शनिवारी दुपारी ३ वाजून ३६ मिनिटांनी चंद्रोदय होईल. उत्तररात्री ३ वाजून ३३ मिनिटांनी चंद्र अस्त होईल. त्यामुळे रात्री काळोख पडल्यापासून उत्तर रात्री ३.३३ पर्यंत चंद्रनिरीक्षण करता येईल, अशी माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.

खगोल मंडळातर्फे आंतरराष्ट्रीय चंद्रनिरीक्षण दिवसानिमित्त शनिवारी विनामूल्य आकाशदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत शिवाजी पार्कजवळील माहीम स्पोर्ट्स क्लब (शिवाजी पुतळ्याजवळ) येथे हा कार्यक्रम होणार आहे.