जागतिक पुस्तक दिन : ई-कॉमर्सच्या युगातही पुस्तकांना मोठी मागणी
वाचकांचा अनुनय करणारी व लोकप्रिय पुस्तके विकणारी पुस्तकांची दुकाने सर्वत्र पाहायला मिळतात, परंतु जगभरातील दुर्मिळ तसेच अभिजात पुस्तके स्वत: निवडून वाचकांना पुरविणारे ग्रंथविक्रेते मात्र फारच कमी असतात. आजच्या ‘ई-कॉमर्स’च्या युगात तर असे ग्रंथविक्रेते दुर्मिळ होत असतानाच दक्षिण मुंबईमधील फोर्ट येथे काही महिन्यांपूर्वीच ‘वेवर्ड अ‍ॅण्ड वाईज’ हे अभिजात इंग्रजी पुस्तकांचे नवीन दुकान सुरु झाल्याने मुंबईमधील पट्टीच्या वाचकांसाठी आस्थेचे ठिकाणच तयार झाले आहे.
एकीकडे दक्षिण मुंबईमधील ऱ्हिदम हाऊस, समोवार कॅफे यांसारखी सांस्कृतिक प्रतिके बंद पडत असताना अनेक वर्षांचा पुस्तक विक्रीचा अनुभव असलेल्या विराट चांडोक व व्यावसायिक अतुल सूद या दोघा पुस्तकप्रेमींच्या कल्पनेतून ‘वेवर्ड अ‍ॅण्ड वाईज’ सुरु करण्यात आले आहे. मुंबईमध्ये न्यू अ‍ॅण्ड सेकंडहॅण्ड बुकशॉप, कोकिळ अ‍ॅण्ड कंपनी, अलवी बुक डेपो यांसारख्या दुकानांनी एकेकाळी ग्रंथप्रेमींची वाचनभूक भागवत असत. परंतु, ती आता बंद पडली आहेत. याशिवाय फोर्ट, चर्चगेटच्या परिसरात पदपथावरील पुस्तकविक्रेते तसेच किताबखाना, क्रॉसवर्ड सारखी काही दुकाने आजही वाचकांना पुस्तके पुरवत असतात.
येथे वाचकांमध्ये लोकप्रिय, विशेषत: चांगला खप असणारी पुस्तकेच मोठय़ा प्रमाणावर विकण्यासाठी ठेवली जातात. परंतु, ग्राहकांच्या वाचनाला निश्चित दिशा देणारी, त्यांना अज्ञात असणारी, इतर ठिकाणी सहसा न मिळणारी पुस्तके मिळणारे पुस्तकांचे दुकान मात्र उपलब्ध नव्हते.
त्यामुळे दिल्ली येथील के.डी. सिंग यांच्या ‘द बुक शॉप’ ची शाखा येथे सुरु करण्याचा विचार होता परंतु गेल्या वर्षी त्यांचा मृत्यू झाल्याने ते शक्य झाले नाही. त्यामुळे शेवटी आम्ही स्वतंत्र दुकान सुरु करायचे ठरविल्याचे ‘वेवर्ड अ‍ॅण्ड वाईज’चे मालक अतुल सूद यांनी सांगितले.
‘लोटस बुक हाऊस’ तसेच ‘क्रॉसवर्ड’ सारख्या दुकानांमध्ये काम केलेल्या तसेच स्वत: चोखंदळ वाचक असलेले विराट चांडोक हे ‘वेवर्ड अ‍ॅण्ड वाईज’ चे व्यवस्थापन करत आहेत.

पुस्तकविक्रीत वेगळा प्रयोग -सूद
ग्राहकांना जागतिक वाङ्मयातील उत्तमोत्तम पुस्तके उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे जाणवल्यानेच पुस्तकविक्री मध्ये वेगळा प्रयोग करण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले असून व्यवसायापेक्षा ग्राहकांना मिळणारा वाचनानंद आम्हाला महत्त्वाचा वाटतो. यामुळेच जगभरातील सुमारे तीन लाख पुस्तकांमधून आठ हजार निवडक पुस्तके स्वत: शोधून वाचकांसाठी येथे ठेवली आहेत, असे ‘वेवर्ड अ‍ॅण्ड वाईज’चे मालक अतुल सूद यांनी सांगितले