निम्म्या दरात निवासव्यवस्था; अनेक सुविधांचा समावेश  

सुहास जोशी, लोकसत्ता

मुंबई : वाहतुकीचे निर्बंध हटवल्यानंतर आणि हॉटेल्स पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अनेक हॉटेल चालकांनी विविध क्लृप्त्या वापरण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य सुरक्षेसाठी ‘२४० स्पर्श बिंदू’च्या (टच पॉईन्ट्स) निर्जंतुकीकरणापासून ते निम्म्या दरात निवास सुविधा देण्यापर्यंतच्या अनेक आकर्षक योजनांचा त्यात समावेश आहे.

गेल्या १५ दिवसांत गिरिस्थानांवरील, तसेच पर्यटन स्थळांवरील रिसॉर्ट, हॉटेलना सुमारे ३० टक्के  प्रतिसाद मिळत आहे. ‘हॉटेलमधील स्पा, तरणतलाव, व्यायामशाळा यांसारख्या सुविधा सध्या वापरता येत नसल्याने काही हॉटेल मोठय़ा सवलती देत आहेत. निर्जंतुकीकरणाच्या सुविधा, किमान संपर्क आणि इतर बाबींसाठी सर्वसाधारण कार्यप्रणाली सर्वत्र आहेच, पण अनेक ठिकाणी पर्यटकांच्या वाहनांचेही निर्जंतुकीकरण केले जात असल्याचे ‘फेडरेशन ऑफ हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरन्ट असोसिएशन’चे राष्ट्रीय उपाध्यक्ष गुर्बक्षिसिंग कोहली यांनी सांगितले.  ग्राहकांना आरोग्य सुरक्षेच्यादृष्टीने आश्वस्त करण्यासाठी मॅरीएट हॉटेलने विशेष दक्षता घेण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार पर्यटकांचा वावर असणाऱ्या तसेच स्पर्श होईल अशा ‘२४० टच पॉईन्टस’च्या निर्जंतुकीकरणाची सुविधा देऊ केली आहे. पर्यटकांच्या वाहनाची चावी, मोबाईल आदी उपकरणांचेदेखील युव्ही स्कॅनकरद्वारे निर्जंतुकीकरण केले जात असल्याचे ‘मॅरिएट’च्या प्रवक्त्याने सांगितले.

‘निर्जंतुकीकरणाच्या सर्व सुविधांबरोबरच पर्यटक शहरात परत गेल्यानंतर सात दिवस रिसॉर्ट व्यवस्थापन त्यांच्या दूरध्वनी संपर्कात राहत आहे. करोनाचा संसर्ग झाला नाही ना याबाबतच्या पाठपुराव्याचा एक भाग म्हणून ही विशेष दक्षता घेतली जात आहे’, असे ‘डय़ूक्स रिट्रिट’च्या सोनाली ठक्कर यांनी सांगितले.

पर्यटकांचा रिसॉर्ट कर्मचाऱ्यांशी कमीत कमी संपर्क यावा यासाठी संपूर्ण प्रक्रिया डिजिटाईज केल्याचे,’ क्लब महिंद्राचे मुख्य संचालन अधिकारी विवेक खन्ना यांनी सांगितले. यामध्ये रिसॉर्टच्या खोलीतूनच अ‍ॅपद्वारे मेन्यू पाहून खाद्यपदार्थ मागविण्याचीही सुविधा देण्यात आली आहे. तर पर्यटकास शहरापासून रिसॉर्टपर्यंत वाहनसुविधा हवी असल्यास तीही सवलतीच्या दरात दिली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यात पर्यटनास परवानगी नसली तरी कर्नाटकात परवानगी असल्याने हंपी, बदामी येथे पर्यटकांना नेण्यात अडचण नाही. त्यामुळे अशा छोटय़ा समूह सहली केल्याचे ‘ईशा टूर्स’चे संचालक आत्माराम परब यांनी सांगितले. तर सध्या लेह, कारगील, केलाँग येथील काही हॉटेल्समध्ये थेट ५० टक्के सवलत मिळत असल्याने लडाखच्या सरत्या मोसमाचा लाभ पर्यटकांना मिळू शकतो, असे त्यांनी नमूद केले.

हॉटेलचालक गेल्या काही दिवसांत अधिक सक्रीय झाले आहेत. परदेशातील हॉटेल्सकडून पर्यटन कंपन्यांना हॉटेलमधील सर्व सुरक्षा उपाय पाहण्यासाठी आमंत्रित केले जात असल्याचे ‘वीणा वर्ल्ड’च्या वीणा पाटील यांनी सांगितले. अनेक महिने घरी बसून कंटाळलेले पर्यटकही सहलींबद्दल विचारणा करीत असल्याने त्यादृष्टीने सहली आखल्या जातील असेही त्या म्हणाल्या.

पर्यटकांसाठी सेवा-सुविधा

– पर्यटकास शहरापासून रिसॉर्टपर्यंत सवलतीच्या दरात वाहनसेवा.

– पर्यटकांच्या वाहनाची चावी, मोबाईल आदी उपकरणांचे युव्ही स्कॅनकरद्वारे निर्जंतुकीकरण.

– रिसॉर्टच्या खोलीतूनच अ‍ॅपद्वारे मेन्यू पाहून खाद्यपदार्थ मागविण्याची सुविधा.

– पर्यटक शहरात परतल्यानंतर सात दिवसांपर्यंत रिसॉर्ट व्यवस्थापन त्यांच्या दूरध्वनी संपर्कात.

– करोना विषाणूचा संसर्ग तर झाला नाही ना, याच्या खातरजमेसाठी पर्यटकांकडे पाठपुरावा.

सामायिक पर्यटन धोरणाची गरज!

आंतरराष्ट्रीय पर्यटन पुढील मार्चपर्यंत सुरू होण्याची शक्यता नाही. त्यामुळे देशांतर्गत पर्यटनास सध्या मोठा वाव आहे. या काळात देशातील पर्यटनासाठी एक ‘सामायिक पर्यटन धोरण’ जाहीर करण्याची गरज आहे, असे ‘वीणा वर्ल्ड’च्या वीणा पाटील यांनी सांगितले. पर्यटन कंपन्या, हॉटेलचालक यांच्यासाठी ते मार्गदर्शक ठरेल आणि पर्यटकही आश्वस्त होऊन बाहेर पडतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.