पाण्याची कमतरता, पाणी वाया घालवणे, दूषित पाण्यातून पसरणारे आजार या सगळ्याविषयी आतापर्यंत अनेक प्रकारे जनजागृती करण्यात आली आहे. दोन वष्रे सलग दुष्काळ पडल्यावर पाणी जपून वापरण्याबाबत अंमलबजावणी झालीही होती, पण गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला आणि पाण्याच्या जनजागृतीवर पाणी फेरले गेले.

या सर्व पाढय़ाची उजळणी करण्याचे कारण म्हणजे काल २२ मार्च हा जागतिक जलदिन होता. पाणी वाया का घालवावे, हा या वर्षीचा मंत्र. मात्र तो फक्त या वर्षांपुरता लागू नाही. पाऊस कमी पडला की त्या वर्षी पाणी कमी वापरावे आणि पाऊस चांगला झाला की पाणी मुबलक वापरायला हरकत नाही, असा आपला एक समज असतो. मात्र पाण्याची मुबलकता हाच आता चिकित्सेचा विषय झाला आहे. जगभरातच भूजलसाठा कमी होत आहे. त्यातच वापरता येऊ शकणाऱ्या पाण्याचे जगभरातील वितरण असमान आहे. जगभरातील एकूण पाण्याच्या केवळ २.५ टक्के पाणी पिण्यायोग्य आहे आणि त्यातलेही दोनतृतीयांश हे उत्तर व दक्षिण ध्रुवावरील बर्फाच्या साठय़ाच्या स्वरूपात आहे, हे तर तुम्हाला माहिती असेलच. भारतीय सरकारच्या अधिकृत आकडेवारीवरून आपल्याला देशातील वापरायोग्य पाण्याची कल्पना येऊ शकते. जगभराची लोकसंख्या ७५० कोटी आहे, त्यातील सुमारे १३० कोटी म्हणजे १७ टक्के लोक भारतात राहतात. पण भारताची जमीन ही एकूण जमिनीच्या केवळ २.४ टक्के आहे आणि जगातील एकूण जलसाठय़ापकी केवळ ४ टक्के पाणी भारतात आहे. प्रति माणशी पाण्याच्या उपलब्धतेत भारताचा क्रमांक तब्बल १३२वा आहे. सर्वात महत्त्वाचे, भारतात सरासरी ११६० मिलिमीटर पाऊस पडतो आणि जगाची सरासरी १११० मिलीमीटर म्हणजे भारतापेक्षा कमी आहे. आणि तरीही भारतात पाण्याची तूट आढळते. एकीकडे हे पाणी साठवण्यासाठी अधिकाधिक धरणांची आणि नदीजोड प्रकल्पांची कल्पना वास्तवात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र धरण बांधणे किंवा नदीजोड ही वाटते तितकी सहज प्रक्रिया नाही. यासाठी लागणारा प्रचंड निधी ही समस्या आहेच, शिवाय यामुळे होणारा पर्यावरणीय ऱ्हास हादेखील मुद्दा आहे. एक धरण बांधताना होणारे गावांचे विस्थापन, झाडांवर येणारी कुऱ्हाड आणि जंगल गेल्यामुळे तेथील प्राणी-पक्ष्यांचेही होणारे विस्थापन याची पर्यावरणीय किंमत खूप अधिक आहे. शिवाय कितीही धरणे बांधली तरी ती लोकसंख्येसाठी अपुरी पडणार या वास्तवाची सर्वच राज्यकर्त्यांना कल्पना आहे. तिसरे महायुद्ध झालेच तर ते तेलाऐवजी पाण्यावरून होईल, असे सांगितले जाते. सध्या राज्याराज्याअंतर्गत नदीच्या पाणीवाटपावरून सुरू असलेले वाद आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांनाही दाद न देण्याएवढा हेकेखोरपणा पाहिल्यावर जलयुद्धाची चाहूल लागते.

पाणीवाटपावरून राज्याराज्यांत वाद असले तरी राज्याअंतर्गतही पाण्याचे वाटप हे कायम असमान राहिले आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरांना नेहमीच पाण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. कोणतीही तोशीस न करता, अत्यंत अल्प किमतीत पाणी घरात नळावाटे येत असल्याने ग्रामीण भागातील पाण्याच्या अनुपलब्धेकडे पाहण्याची गरज आपल्याला वाटत नाही. एक दिवस पाणी कमी आले की ओरड करणाऱ्या आपल्यापकी किती जणांच्या मूळ गावी पाण्याची मुबलक उपलब्धता आहे, असा प्रश्न स्वतलाच विचारायला हवा. अनुभवाने शहाणपण येते असे म्हणतात, पण पाण्याच्या बाबतीत काही ते लागू होत नाही असे दिसते. नाहीतर, एका हंडय़ासाठी मलभर चालल्याच्या आठवणी सांगणारे रोज ताजे पाणी भरून घेण्यासाठी आदल्या दिवशी भरून ठेवलेली पाण्याची भांडी सकाळी रिती का करतील? हे ताजे पाणी प्रकरण समजून घेणे पण मनोरंजक आहे. पालिकेच्या नळातून येणारे पाणी तलाव आणि शुद्धीकरण केंद्रातून घरी पोहोचेपर्यंतही साधारण एक दिवस लागतो. त्यातही या तलावात ते पावसाळ्यापासून असते. पावसाचे पाणी हे  नसíगक ऋतुचक्रातून आलेले असते. म्हणजे मुळात वर्षभर आधीपासून ते वाफेच्या रूपात हवेत गेलेले असते. खरे तर आपण आज जे पाणी आपण वापरतो ते लाखो-करोडो वर्षांपूर्वी – पृथ्वी जेव्हा जन्माला आली, तेव्हापासून आहे. निसर्ग तेच पाणी आपल्याला पुनर्चक्रित (रिसायकल) करून देत असतो. हे पाणी आपण शुद्ध, ताजे म्हणून वापरतो, मात्र माणसाने तयार केलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पातील पाण्याकडे पाहून नाक मुरडतो.

बचत हा कमावण्याचाच एक मार्ग आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. पाण्याचा कमी वापर, पुन्हा पुन्हा वापर आणि दूषित झालेल्या पाण्याचा पूनर्वापर करण्यासाठी प्रयत्न अशा तीन पातळ्यांवर प्रयत्न केल्यास जगाला भेडसावणारी पाण्याची समस्या काही प्रमाणात कमी होईल. यातील पाण्याचा कमी वापर आणि पाण्याचा पुन्हा वापर (म्हणजे भाजी धुण्याचे पाणी कुंडय़ांना, कपडे धुण्यासाठी वापरलेले शेवटचे पाणी लादी पुसण्यासाठी इ.) या दोन्ही गोष्टी वैयक्तिक पातळीवर करण्यासारख्या आहेत. या जलदिनानिमित्त स्वत:पासून सुरुवात तर करून पाहू.

तळटीप – पंधरवडय़ापूर्वी पोयसर नदीसंबंधी लिहिलेल्या लेखात उल्लेख केलेल्या रिव्हरमार्चचे संकेतस्थळ www.rivermarchforindia.org असे आहे.

prajakta.kasale@expressindia.com