आज जागतिक पाणथळ दिवस : विकासकामे, प्रदूषण यांमुळे जैवविविधता लोप पावण्याची भीती

मुंबईच्या एकूण सुमारे ६०० चौरस किलोमीटर क्षेत्रफळापैकी तब्बल १४० चौरस किलोमीटर क्षेत्रफळ पाणथळीने व्यापलेले असताना या विस्तृत परिसराच्या विकासाबाबत आजवर कोणतेही प्रयत्न न झाल्याने या क्षेत्रातील जैवविविधता धोक्यात आली आहे. मुंबईतील शिवडी, माहीम, गोराई खाडी ही पाणथळ क्षेत्रे जैवविधितेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत. मात्र हे क्षेत्र विकासकामांचा आणि प्रदूषणाच्या विळख्यात जखडले असून त्याकडे प्रशासकीय यंत्रणांचे फारसे लक्ष गेलेले नाही.

पाणथळ जमिनींच्या संवर्धनाच्या उद्देशाने २ फेब्रुवारी १९७१ मध्ये इराणमधल्या रामसर शहरात पाणथळ प्रदेशसंबंधी आंतराष्ट्रीय करार करण्यात आला होता. या पाश्र्वभूमीवर दरवर्षी २ फेब्रुवारी रोजी जागतिक पाणथळ दिवस साजरा करण्यात येतो. रामसर करारानुसार पाणथळ क्षेत्राच्या विकासाकरिता निधी दिला जातो. मात्र हा निधी मिळावा याकरिता राज्य सरकारकडून कोणतेही प्रयत्न न झाल्याने इतक्या वर्षांत मुंबईतील एकाही पाणथळ क्षेत्राचा समावेश ‘रामसार’ यादीत होऊ शकलेला नाही.

मुंबई उच्च न्यायालयाने २०१५ साली पाणथळ जागांवर अनधिकृत बांधकाम करणे हा कायदेशीर गुन्हा ठरविला. तसेच पाणथळ जमिनीच्या संवर्धनाकरिता २०१६ साली एका समितीचे गठनही केले. मुंबईतील पाणथळ क्षेत्रावरील अतिक्रमणावर लक्ष ठेवण्याचे काम या समितीद्वारे केले जाते. मुंबईसह इतर जिल्ह्य़ातील कोणतेही एक पाणथळ क्षेत्र ‘पर्यावरण पर्यटन क्षेत्र’ म्हणून जाहीर करण्याची सूचना या समितीने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती. परंतु या दृष्टीनेही अद्याप काहीच हालचाली झालेल्या नाही.

यासंबंधी समितीचे प्रमुख आणि कोकण आयुक्त जगदीश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘पाणथळ क्षेत्राचा जर पर्यटनाच्या दृष्टीने विकास केला तर त्या ठिकाणी भेट देणाऱ्यांना या क्षेत्राचे महत्त्व समजेल.

तसेच त्या ठिकाणी होणाऱ्या अनधिकृत बांधकामावरही र्निबध येईल. आमचे प्रयत्न या दृष्टीने सुरू आहेत.’

अतिक्रमणे मुळावर

शिवडी खाडी परिसर हा दलदल-जमिनीसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी लाखोंच्या संख्येने स्थलांतरित पक्षी, खासकरून फ्लेमिंगो या ठिकाणी स्थलांतर करतात. मात्र शिवडी खाडी परिसरातील पाणथळ जमिनीवर बोटींनी अतिक्रमण केले आहे. वसई, उरण येथील बोटमालकांनी आपल्या बोटी येथील कांदळवनांच्या दलदली जमिनीवर नांगरून ठेवल्या आहेत. शिवाय प्रक्रिया न केलेले सांडपाणी पाणथळ क्षेत्रात सोडले जात आहे. त्यामुळे या क्षेत्राची सुपिकता नष्ट होत चालली आहे.

मुंबईत १४० चौरस किलोमीटरचे पाणथळ क्षेत्र

महाराष्ट्राला लाभलेल्या सुमारे ७२० कि.मी. लांब किनारपट्टीपैकी मुंबईतील वाटय़ाला अंदाजे ११४ कि.मी. किनारी क्षेत्र आले आहे. वालुकामय, खडकाळ, कांदळवन-दलदल जमीन, खाडी, कोंडपाणी क्षेत्र, नदी, प्रवाळ भित्ती, मानवनिर्मित तलाव, मिठागरे, जलाशये, धरणे ही पाणथळ क्षेत्रे आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या ‘नॅशनल वेटलॅण्ड अ‍ॅटलास, महाराष्ट्र’ नुसार मुंबईत मोठय़ा संख्येने पाणथळ क्षेत्रे आहेत. मुंबई उपनगराच्या ५३४ चौरस किलोमीटर भौगोलिक क्षेत्रापैकी १३२.३२ चौरस किलोमीटर क्षेत्रावर ४१२ पाणथळ क्षेत्रे आहेत. तर मुंबई शहराच्या ६९ चौरस किलोमीटर क्षेत्रापैकी ७.६३ चौरस किलोमीटर क्षेत्रावर ६३ पाणथळ क्षेत्रे आहेत.

कांदळवन संरक्षण विभागाच्या प्रयत्नामुळे मुंबईसभोवती पसरलेल्या कांदळवनांचे संरक्षण व संवर्धन होत आहे. मात्र महापालिका, जिल्हाधिकारी आणि खासगी क्षेत्रांमध्ये असलेल्या पाणथळ जमिनीवर अतिक्रमण वाढते आहे. त्यामुळे वनविभागाने या जमिनी हस्तांतरित करून त्यांचे जतन करणे आवश्यक आहे.

डी. स्टॅलिन, अध्यक्ष, वनशक्ती

मुंबईतील पाणथळ क्षेत्रात अस्तिवात असणाऱ्या सागरी जीवांची माहिती ‘मरिन लाइफ ऑफ मुंबई’ या उपक्रमाच्या माध्यमातून दिली जात आहे. मात्र प्रक्रिया न केलेले सांडपाणी पाणथळ जमिनीवर सोडले जाते. त्यामुळे या ठिकाणच्या सागरी जीवांना धोका उद्भवत आहे. या जमिनीची सुपिकताही नष्ट होत चालली आहे.

प्रदीप पाताडे, सागरी जीवांचे अभ्यासक