जागतिक महिला दिनानिमित्त स्वत:चे अवकाश शोधणाऱ्या महिलांचे अनुभव, चर्चा

काच ही एकाच वेळी कठीण व ठिसूळ असते. स्त्रियादेखील एकाच वेळी भावुक व कणखर असतात आणि त्यामुळेच अजूनही पुरुषप्रधान असलेल्या समाजात पुढे जाताना त्यांच्या वाटा वेगळ्या ठरतात. स्वत:ची वेगळी वाट निवडून इतरांना मार्गदर्शक ठरणाऱ्या महिलांचे अनुभव, मते व चर्चा यांचा मिलाफ म्हणजे ‘लोकसत्ता’ आयोजित बदलता महाराष्ट्रचे आगामी पर्व ‘कर्ती आणि करविती’. जागतिक महिला दिनाच्या पाश्र्वभूमीवर ९ आणि १० मार्च रोजी मुंबईत हा परिसंवाद होत आहे.

देशाच्या स्वातंत्र्यासोबतच शिक्षण व मतदानाचा हक्क मिळाला असला तरी भारतीय स्त्रियांना समानतेसाठी मात्र अजूनही प्रयत्न करावे लागत आहेत. एकीकडे समानतेचा लढा सुरू असतानाच अनेक स्त्रिया आपापल्या क्षेत्रांमध्ये कर्ती आणि करवितीची भूमिका बजावत आहेत. मॉडेलिंगपासून संशोधनापर्यंत, अर्थजगतापासून राजकारणापर्यंत, प्रशासकीय सेवेपासून सामाजिक लढय़ापर्यंत सर्वत्र कर्त्यां भूमिकेत आपला ठसा उमटवणाऱ्या महिलांच्या या ध्येयापर्यंत पोहोचण्याच्या वाटा वेगळ्या असल्या तरी काही धागे मात्र समान आहेत. या समान धाग्यांनी गुंफलेल्या वीस स्त्रिया दोनदिवसीय परिषदेत विविध विषयांवरील चर्चासत्रात सहभागी होत आहेत.

स्त्रियांनी शिकावे का, नोकरीसाठी घराबाहेर पडावे का, असे प्रश्न  आता बाजूला पडले आहेत. एकीकडे स्त्रियांच्या शिक्षण, नोकरीला मान्यता देताना त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाला मात्र अजूनही नाकारले जाते. स्त्रियांचे यश-अपयश हे अजूनही पुरुषांच्या मापदंडातूनच मोजले जाते. कुटुंबाच्या पारंपरिक चौकटीला भेदून स्वत:च्या अवकाशाच्या शोधात निघालेल्या स्त्रीला प्रत्येक टप्प्यावर तिचे पावित्र्य सिद्ध करण्याची वेळ येते. धर्म, रूढी, परंपरांमधून पुढे येणाऱ्या स्त्री प्रतिमांच्या आधारे आधुनिक स्त्रियांची तुलना केली जाते. मात्र या सर्व चर्चेच्या केंद्रस्थानी असणाऱ्या महिलांना या साऱ्या मतांविषयी काय वाटते, धर्म, शिक्षण- करिअर, वेगळ्या वाटा, राजकारण अशा विविध विषयांबाबत त्यांचे विचार कोणत्या दिशेने जातात, याचा आलेख बदलता महाराष्ट्र उपक्रमात मांडला जाईल. आतापर्यंत बदलता महाराष्ट्रमध्ये शिक्षण, उद्योग, अर्धनागरीकरण, सामाजिक चळवळी, शेती, पर्यावरण, पायाभूत सुविधा अशा विषयांचा परामर्श घेण्यात आला. यंदा महिलांची सद्य:स्थिती व भविष्यातील वाटचालीसंबंधी ऊहापोह केला जाईल. पन्नास टक्के  लोकसंख्या असलेल्या या गटाला समानतेच्या वाटेवर आणण्याचा प्रयत्न होईल.

टीजेएसबी सहकारी बँक लि. प्रस्तुत लोकसत्ता बदलता महाराष्ट्र, सहप्रायोजक एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर्स डेव्हलपर्स लि. टेलिव्हिजन पार्टनर ‘झी २४ तास’