जगातील सर्वाधिक वजन असलेली महिला ईमान अहमदचे वजन निम्म्याने घटले आहे. दोन महिन्यांपूर्वी ईमानचे वय ५०० किलो होते. ईमानचे वजन आता निम्म्याने कमी झाले असून ती व्हिलचेअर बसू शकते आहे. आता ईमानला बराच वेळ व्हिलचेअरवर बसणे शक्य होत आहे. ईमानवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी याबद्दलची माहिती दिली आहे.

आधीच्या तुलनेत जास्त वजन घटलेल्या आणि आनंदात असलेल्या ईमानचा व्हिडीओ डॉक्टरांनी शेअर केला आहे. मुंबईतील चर्नीरोडमधील सैफी रुग्णालयात ईमानवर उपचार सुरु आहेत. ईमानवर ७ मार्चला सर्जरी करण्यात आली होती. मुंबईत उपचार सुरु झाल्यापासून ईमानचे वजय जवळपास २५० किलोंनी घटले आहे. १८ एप्रिलला ईमानचा व्हिडिओ चित्रीत करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

‘अखेर ईमान व्हिलचेअरमध्ये बसू शकते आहे. तीन महिन्यांआधी अशी कल्पनादेखील शक्य नव्हती. आता ईमान अगदी व्यवस्थित आहे,’ असे डॉ. अपर्णा गोविल यांनी म्हटले. ईमानची स्थिती पूर्वीपेक्षा खूप चांगली असून ती जास्त अलर्ट असते आणि नियमितपणे फिजिओथेरेपी घेते, असेही गोविल यांनी सांगितले.

सैफी रुग्णालयात डॉक्टर ईमानच्या न्यूरॉलॉजिकल समस्यांमुळे चिंतेत आहेत. ईमानला अधूनमधून चक्कर येते. तीन वर्षांपूर्वी बसलेल्या एका धक्क्यामुळे ईमानच्या डाव्या बाजूला दुखापत झाली होती. त्यामुळे ईमानला चक्कर येण्याचा त्रास होत असावा, अशी शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.