सीटीस्कॅननंतर इजिप्तला परतणार

इजिप्तहून बेरियाट्रिक शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबईत आलेल्या इमान अहमद (३६) या महिलेच्या पायाचे स्नायू अशक्त असल्यामुळे यापुढे तिचे वजन कमी झाले तरी तिला भविष्यात चालता येणार नाही, असे सैफी रुग्णालयातील डॉक्टरांकडून सांगण्यात आले. सैफी रुग्णालयाने फेब्रुवारी महिन्यात इमानला उपचारासाठी मुंबईत आणले होते. गेली २५ वर्षे इमान अंथरुणाला खिळलेली होती. त्यात तिच्या उजव्या शरीराला अर्धागवायूचा झटका आल्याने पायांचे स्नायू कमकुवत झाले असल्याचे सैफी रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले.

इमानला शुक्रवारी विशेष खोलीतून हलविण्यात आले आहे. सध्या इमान सैफी रुग्णालयाच्या मुख्य इमारतीतील खोलीत राहत आहे. शुक्रवारी रात्री इमानची खाट क्रेनच्या साहाय्याने हलविण्यात आली. दोन महिन्यांपूर्वी इमानचे वजन ४९८ किलो होते ते आता २५० किलोपर्यंत पोहोचले आहे. गेले दोन महिने सुरू असलेल्या फिजीओथेरपी आणि औषधांमुळे तिचे वजन झपाटय़ाने कमी होत आहे. सध्या इमानचा थायरॉईड आजार नियंत्रणात आहे, त्याशिवाय तिचे मूत्रपिंडही व्यवस्थित काम करीत आहे. इमानचे वजन कमी करण्यासाठी ६० टक्के उपचार पूर्ण झाले आहेत, मात्र अजूनही तिच्या मज्जासंस्थेसंदर्भातील उपचार सुरू आहेत, असे इमानवर उपचार करणारे डॉ. मुझफ्फर लकडावाला यांनी सांगितले. सध्या ती पाठ टेकून बसू शकते. वयाच्या ११ व्या वर्षी तिला अर्धागवायूचा झटका आला होता. त्यात तिच्या पायाच्या स्नायूंचे बळकटीकरण झाले नाही. या कारणाने यापुढे इमान केव्हाच चालू शकणार नाही. मात्र असे असले तरी इमान इजिप्तला जाताना स्वत: बसू शकेल,असा विश्वास डॉ. लकडावाला यांनी व्यक्त केला आहे.

५० किलो घटल्यानंतर सीटीस्कॅन तपासणी

सैफी रुग्णालयातील सीटीस्कॅन यंत्र २०४ किलोपर्यंतचे वजन पेलू शकते. मात्र अजूनही इमानचे वजन २५० किलोपर्यंत आहे. त्यामुळे सध्या तरी तिला सीटीस्कॅन यंत्रात शिरणे शक्य नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत तिचे ५० किलो वजन कमी झाल्यानंतरच तिच्या मज्जासंस्थेसंदर्भात उपचार करणे शक्य होणार आहे. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतरच इमानला इजिप्तला पाठविण्यात येईल.