25 September 2020

News Flash

जगातील सर्वात मोठे साथरोग रुग्णालय मुंबईत!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संकल्पना

संग्रहित छायाचित्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संकल्पना; पाच हजार खाटांची क्षमता

संदीप आचार्य

करोनासह साथीच्या अन्य आजारांचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईत जगातील सर्वात मोठे साथरोग रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाच हजार खाटांचे हे रुग्णालय मुलुंड येथे उभारण्यात येणार असून त्यासाठी लागणारा सर्व निधी मुंबई महापालिकेकडून उभारला जाणार आहे.

करोनाचा पहिला रुग्ण मुंबईत आढळला तेव्हा मुंबईत केवळ कस्तुरबा हेच साथरोग रुग्णालय उपचारांसाठी उपलब्ध होते. पुढे करोनाची साथ वेगाने पसरत गेली आणि एकटय़ा मुंबईत आज करोनाचे एक लाख दोन हजार ४२३ रुग्ण  आहेत, तर पाच हजार ८५५  करोना रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. एकीकडे करोना तर दुसरीकडे पावसाळ्यातील साथीचे आजार असा दुहेरी सामना आगामी काळात करावा लागणार आहे.

तसे दरवर्षी पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबते. मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसिस व स्वाईन फ्लूच्या रुग्णांवरील उपचार हा एक प्रश्नच असतो. गेल्या काही वर्षांत जागतिक आरोग्य संघटनेने एखाद्या साथीच्या आजाराबाबत ‘रेड अलर्ट’ दिला की आपली तुटपुंजी आरोग्य यंत्रणा मिळेल तशी धावत सुटते.

करोनाचा सामना करतानाही सुरुवातीला आरोग्य यंत्रणांची अवस्था आंधळ्यांच्या शर्यतीसारखी होती. या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील साथीचे आजार  व उपाययोजना यांचा सखोल आढावा घेतला. अनेक तज्ज्ञांशी चर्चा केली. यातून मुंबईत जगातील सर्वात मोठे साथरोग रुग्णालय उभारण्याची योजना आकाराला आली.

करोनाची साथ आज जशी आली तशी भविष्यात आणखी कुठली साथ आलीच तर त्याचा सक्षमपणे सामना करण्यास महाराष्ट्र तयार असला पाहिजे, हा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केला असून राज्याचा विचार करता मुंबईत असे सर्वात मोठे साथरोग रुग्णालय उभारणे हे सर्वार्थाने योग्य ठरणार आहे. यातूनच मुलुंड येथे महापालिकेचे जगातील सर्वात मोठे म्हणजे जवळपास पाच हजार खाटांचे साथरोग रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आर्थिक तजवीज

मुंबई महापालिकेचा आरोग्याचा अर्थसंकल्प हा ४२६० कोटी रुपयांचा असून गेल्या वर्षीपेक्षा तो १५ टक्कय़ांनी जास्त आहे. गेल्या वर्षी पालिकेचे आरोग्याचा अर्थसंकल्प हा ४१५१ कोटींचा होता. आगामी वर्षांत पालिकेने गोवंडी शताब्दी रुग्णालयाच्या पुनर्विकासासाठी ५०२ कोटींची व्यवस्था केली तर मुलुंडच्या एम. टी. अगरवाल रुग्णालयासाठी ४५८ कोटी आणि भगवती रुग्णालयाच्या पुनर्विकासासाठी ५९२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आता आगामी अर्थसंकल्पात मुलुंडच्या पाच हजार खाटांच्या साथरोग रुग्णालयासाठी स्वतंत्र तरतूद केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. आवश्यकता लागल्यास राज्य सरकार यासाठी निधी उपलब्ध करून देईल असेही एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.

चार हजार कोटींचा प्रकल्प

मुख्यमंत्री ठाकरे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर याबाबतची संकल्पना आकाराला आली आहे. यात साथरोग आजाराबरोबर मल्टिस्पेशालिटी तसेच साथरोग संशोधनापासून तज्ज्ञांसाठी व्यासपीठ उभारले जाणार आहे. जवळपास चार हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प होऊ शकतो, असे काही ज्येष्ठ डॉक्टरांनी सांगितले.

जागतिक निविदा मागविणार

पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सांगितले की,  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संकल्पना पक्की आहे. राज्यातील साथरोगाचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी एक स्वतंत्र रुग्णालय असण्याची आवश्यकता लक्षात घेऊनच ही संकल्पना आकाराला आली. जगातील हे सर्वात मोठे साथरोग रुग्णालय असल्याने याचा आराखडा तयार करण्यासाठी जागतिक पातळीवर निविदा मागविण्यात येईल. रुग्णालयाबाबत आज काही तज्ज्ञांशी चर्चा केल्याचे सांगून आयुक्त म्हणाले की, हे रुग्णालय नियोजित वेळेत पूर्ण करण्याला आमचे प्राधान्य राहील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 1:21 am

Web Title: worlds largest communicable disease hospital in mumbai abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 दोन दिवस पावसाचा अंदाज
2 विद्यापीठाची प्रथम वर्षांची प्रवेश प्रक्रिया सुरू
3 मुंबईत २४ तासांत ६२ रुग्णांचा मृत्यू
Just Now!
X