संपूर्ण मोसमात अवघ्या १२१४ मिमी पावसाची नोंद; अंधेरी, चेंबूर, कुर्ला, पनवेलमध्ये मात्र धुवांधार

राज्याच्या प्रत्येक भागात जसा अनुशेष असतो तसा मुंबईच्या पावसाच्या बाबतीत बोलायचे तर तो यंदा वरळीच्या वाटय़ाला आला आहे. समुद्रकिनारी वसलेल्या या भागामध्ये भन्नाट वाऱ्यामुळे ढगांना थारा मिळत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे, मुंबईच्या इतरत्र भागात ३७४२ मिमीपर्यंत कोसळणाऱ्या पावसाची धुवाधाँर बॅटिंग सुरू असताना वरळीत यंदा अवघा १२१४ मिमी पाऊस नोंदला गेला आहे. ६०३ चौरस किलोमीटर पसरलेल्या मुंबईत काही किलोमीटरगणिक पावसाच्या नोंदीत पडणारा हा फरक पहिल्यांदाच नोंदण्यात आला आहे. ३० वेगवेगळ्या ठिकाणच्या या नोंदींतील हा फरक थोडाथोडका नसल्याने तो हवामानशास्त्र विभागाच्या कुतूहलाचा विषय ठरतो आहे.

शहरात ३० ठिकाणी बसवण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रावरील नोंदीवरून यावेळी पहिल्यांदाच पावसाचे अनेक ‘कारनामे’ लक्षात आले आहेत. मुंबई हवामानशास्त्र विभागातील अधिकाऱ्यांनी या नोंदींच्या केलेल्या विश्लेषणातून पावसाचा मुंबई पॅटर्न दिसत असून इतर विभागांच्या तुलनेत समुद्राच्या अगदी जवळ असलेल्या वरळी परिसरात पावसाने दडी मारल्याचे नवल समोर आले आहे.

मुंबईकर आता पावसाळ्यातून हिवाळ्यात प्रवेश करत असले तरी मुंबई हवामानशास्त्र विभागातील संशोधक मात्र पावसाळ्यातील चार महिन्यांमधील सरींचे विश्लेषण करण्यात गुंतले होते. दरवर्षीच्या सांताक्रूझ आणि कुलाबा या हवामान केंद्रासोबतच या वर्षी इतरही उपनगरातील केंद्रांची माहिती हाती आल्याने या विश्लेषणात नावीन्यही  आहे. मुंबई हवामानशास्त्र विभागाच्या संशोधक नीता शशिधरन यांनी एकत्रित केलेल्या नोंदीनुसार शहरात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सरासरी ६६ दिवस चांगला पाऊस पडला. चेंबूरमध्ये तब्बल ७५ दिवस तर पनवेलमध्ये ७४ दिवस पाऊस पडला. त्याचवेळी वरळी समुद्रकिनाऱ्यानजीक असलेल्या नेहरू केंद्रातील पर्जन्यमापकातील नोंदीनुसार मात्र या ठिकाणी १२० दिवसांपैकी फक्त ४६ दिवसच पाऊस पडला. अर्थात केवळ हे केंद्र अपवाद नाही. बाजूलाच असलेल्या वरळी येथील बीएमसी कॉलनीतील केंद्रातही फक्त ५३ दिवस पाऊस नोंदला गेला. वरळीत पाऊस कमी पडलाच, शिवाय या ठिकाणी पावसाळ्यात फक्त दोनच दिवस मुसळधार पाऊस म्हणजे दिवसाला ६४.५ मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला.

दक्षिण मुंबईत ‘विषम’ प्रमाण

महानगरपालिका व हवामानशास्त्र विभाग यांनी एकत्रितरीत्या शहरात तीस ठिकाणी केंद्रे सुरू केली आहेत. कोणत्याही अडथळ्याशिवाय चारही महिने सलग नोंद सुरू असलेल्या १५ केंद्रांवरील माहितीचे विश्लेषण करण्यात आले. या माहितीनुसार आणखी एक निरीक्षण मांडण्यात आले आहे.

‘उपनगरातील बहुतांश ठिकाणी पावसाचे प्रमाण सारखे होते. त्याउलट दक्षिण भागात कुलाबा, माजगाव, वरळी या भागात पावसाचे प्रमाण विषम होते. माझगावमध्ये प्रचंड पाऊस पडत असताना वरळीत मात्र त्यामानाने तुरळक पाऊस होता, असे मुंबई हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर म्हणाले. यातून कोणताही निष्कर्ष लगेचच काढता येणार नाही, मात्र अधिकाधिक स्थानिक पातळीवरील या नोंदीमुळे मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरातील हवामान व त्यातील बदल यांची माहिती मिळेल व त्यानुसार शहरनियोजन करण्यात मदत होऊ शकेल, असेही होसाळीकर यांनी स्पष्ट केले.

worli-chart

पावसाची काही निरीक्षणे

  • किनाऱ्यावरील वरळीत कमी दिवस पाऊस
  • वरळीत मुसळधार पावसाचे दिवसही कमी
  • कुर्ला, अंधेरी, नेरूळ, पनवेल या टेकडी असलेल्या ठिकाणी पावसाचे प्रमाण अधिक
  • पूर्व-पश्चिम उपनगरात पाऊस सर्वसाधारण एकसारखा होता, दक्षिण भागात मात्र स्थिती उलट होती.
  • ऑगस्टमध्ये सर्वाधिक पाऊस