मुंबईतील पूर्व-पश्चिम वाहतूक कोंडी कमी करून वेगवान प्रवासासाठी आवश्यक असलेल्या वरळी ते शिवडी या उन्नत मार्गास २१ महिन्यांपूर्वी मंजुरी मिळूनदेखील अजून कामास सुरुवात झालेली नसल्याचे माहिती अधिकारात निष्पन्न झाले आहे.

वरळी ते शिवडी या ४.५१ किमी लांबीच्या उन्नत मार्गाला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत २७ फेब्रुवारी २०१८ ला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार या प्रकल्पाचा खर्च १२७८ कोटी इतका आहे. सद्य:स्थितीत कंत्राटदार आणि सल्लागार नियुक्तीची निविदा प्रक्रिया प्रगतिपथावर असल्याची माहिती एमएमआरडीएने माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली आहे.

शिवडी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडून उन्नत मार्गास सुरुवात होणार असून आचार्य दोंदे मार्ग, जगन्नाथ भातणकर मार्ग, ड्रेनेज चॅनेल रोड या मार्गावरून जात नारायण हर्डीकर मार्ग (प्रभादेवीजवळ) येथे समाप्त होईल. चार मार्गिका असणारा हा उन्नत मार्ग ४.५१ किमीचा आहे. शिवडी रेल्वे स्थानक, मुंबई पोर्ट ट्रस्ट मार्ग आणि प्रभादेवी रेल्वे स्थानक येथे रेल्वे मार्गावरून जाणारा आरओबी प्रस्तावित आहे.

या उन्नत मार्गासाठी अनेक विभागांच्या परवानग्या आवश्यक असून ती प्रक्रिया सुरू असल्याचे यामध्ये प्राधिकरणाने म्हटले आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र सागरी किनारा विभाग व्यवस्थापन प्राधिकरण, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, वाहतूक विभाग आणि मुंबई महानगरपालिकेचे वृक्ष प्राधिकरण या विभागांकडून परवानग्या आवश्यक असून त्या संदर्भातील काम प्रगतिपथावर असल्याचे प्राधिकरणाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.