मुंबईतील ‘नरका’बाबत मानवी हक्क आयोगाकडे दाद मागणार
मुंबईतील चार प्रमुख शवागारांतील गंभीर स्थितीकडे यंत्रणेचे अक्षम्य दुर्लक्ष उघडकीस येत असून कामगारांची अपुरी संख्या आणि सुविधांची चणचण, यामुळे या भीषण परिस्थितीत अधिक भरच पडली आहे. या नरकयातनांना चव्हाटय़ावर आणणाऱ्या कामगारांविरोधात बदलीचे शस्त्रही उपसले गेले असून या नरकयातनांची दाद थेट मानवी हक्क आयोगाकडेच मागितली जाणार आहे.

‘सर्व श्रमिक संघ’चे सचिव कॉम्रेड मिलिंद रानडे यांनी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनाच पत्र लिहून शवागार कर्मचाऱ्यांची दुरवस्था उघडकीस आणली आहे. ‘टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस’मध्ये आरोग्य क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण करत असलेल्या एका विद्यार्थ्यांने या चारही शवागारांमध्ये गेले अनेक महिने अभ्यास केला. तेथील दाहक वास्तवाचे चित्रणही संघटनेकडे उपलब्ध आहे.

शवागारात काम करून निवृत्त झालेल्या बहुतेक कामगारांनी दहा वर्षेही निवृत्तिवेतन घेतलेले नाही, हे वास्तव त्यांच्या आरोग्याची कशी काळजी घेतली जाते ते दर्शविणारे आहे. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे सदस्य येत्या ६ व ७ जानेवारी रोजी मुंबईत येत असून ‘टीआयएसएस’मध्ये या सदस्यांपुढे शवागारांच्या व कामगारांच्या दुरवस्थेचे सारे पुरावे ‘सर्व श्रमिक संघ’ सादर करणार आहे.

या चार शवागारांत १२४ कामगारांची आवश्यकता असताना प्रत्यक्षात केवळ ७८ कामगार आहेत. या कामगारांना पिण्याच्या पाण्याची योग्य सोय नाही. त्यांना कपडे धुण्यासाठी भत्ता मिळतो तो अवघा १५ रुपये महिना.. प्रत्यक्षात शवागारात काम करणाऱ्या कामगारांना शंभर डिग्री तापमान असलेल्या उकळत्या पाण्यात ब्लिचिंग एजंटसह कपडे धुण्याची गरज असताना त्याचा या ठिकाणी पत्ताच नाही. या कामगारांना जे मास्क दिले जातात ते अत्यंत साधे.

प्रत्यक्षात ‘सी-२९’ मास्क, संपूर्ण सुरक्षित हातमोजे, शरीर आच्छादित करणारे सूट, गमबूट तसेच मृतदेह उचलताना पाठीकडे सपोर्ट तसेच डोळ्यांनाही संरक्षण मिळणे गरजेचे आहे. सुई-धागा यासह बहुतेक गोष्टी दर्जेदार मिळत नसल्याची कामगारांची तक्रार आहे.

मृतदेह उलचणाऱ्या कामगाराला महिन्याकाठी पाच हातमोजे, तर मृतदेहाची चिरफाड करणाऱ्या कामगाराला अवघे दहा हातमोजे दिले जातात. प्रत्यक्षात प्रत्येक मृतदेहासाठी वेगळे हातमोजे-मास्क आदी गोष्टी मिळणे आवश्यक आहे. याहूनही गंभीर बाब म्हणजे ज्या ठिकाणी मृतदेहांची चिरफाड होते तेथे जमिनीवरील रक्ताचे डाग धुण्यासाठी योग्य सामग्री उपलब्ध करून दिली जात नाही की, मृतदेह एचआयव्ही, हेपेटायटिस बाधित आहे वा नाही, याचीही या कामगारांना कल्पना दिली जात नाही. याची कसलीच काळजी शासनाकडून घेतली जात नसल्याने शवागारे ही जिवंत कामगारांना नरकयातनांचा अनुभव देणारी केंद्रे बनली आहेत, अशी तक्रार करीत त्यांना न्याय देण्याची मागणी ‘सर्व श्रमिक संघा’चे सचिव रानडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

जे मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयांसाठी दिले जातात अशा मृतदेहांवर फॉर्मलिनसारख्या रसायनांचा वापर करून ते टिकविण्याची प्रक्रिया केली जाते. त्याच्या दाहक वासाचा या कामगारांच्या शरीरावर व डोळ्यांवर काय परिणाम होतो याचाही अभ्यास आजपर्यंत कोणी केलेला नाही. या कामगारांची दर तीन महिन्यांनी वैद्यकीय तपासणी होणे आवश्यक असताना अनेक कामगारांची तीन तीन वर्षे आरोग्य तपासणी करण्यात आलेली नाही. या कामगारांसाठी रानडे व सहकाऱ्यांनी आवाज उठवून संघटना बांधण्यास सुरुवात करताच यातील अनेक कामगारांच्या बदल्या तसेच त्यांना संबंधित अधिकाऱ्यांकडून धमकाविण्यात येत असल्याचे रानडे यांचे म्हणणे आहे.

राजावाडीतील नरकयातना

राजावाडी रुग्णालयातील शवागारामागे एक पाण्याची टाकी आहे. तेथे कुत्रे आणि कामगार एकाच टाकीतील पाणी वापरतात. याबाबत पोलीस सर्जननी पालिकेला कळवले असले, तरी परिस्थितीत कोणताही फरक पडलेला नाही. राजावाडी आणि कुपर येथील शवागारांचे नूतनीकरण करण्यात आले असले, तरी यात कामगारांसाठी साधी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आलेली नाही.

मृतदेहांनाही शिक्षा

गेल्या अनेक वर्षांमधील शवागारांमधील मृतदेहांची संख्या पाहिली तर क्षमतेपेक्षा खूपच अधिक मृतदेह या चारही शवागारात होते. गेल्या महिन्यापर्यंतची आकडेवारी पाहता जे.जे. रुग्णालयातील शवागारवगळता अन्य तिन्ही ठिकाणी जवळपास शंभरापेक्षा जास्त मृतदेह कशाही अवस्थेत होते. यातील बहुतेक मृतदेह आठ महिन्यांपर्यंत पडून होते. ‘सर्व श्रमिक संघा’ने याबाबत आवाज उठविल्यानंतर गेल्या महिनाभरात वेगाने हालचाली होऊन बहुतेक ठिकाणच्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यात आल्याचे दिसून येते. कामगारांच्या गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या शोषणाकडे पाहण्यासही कोणी तयार नसल्याचे भीषण वास्तवही यातून समोर आले आहे.

सर्व सोयी उपलब्ध : पोलीस सर्जनचा दावा

पोलीस सर्जन डॉ. एस. एम. पाटील यांना याबाबत विचारले असता, कामगारांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात असे त्यांनी सांगितले. तसेच चारही शवागारात क्षमतेपेक्षा जास्त मृतदेह नसल्याचा दावा त्यांनी केला. मात्र त्याचवेळी मृतदेहांची विल्हेवाट नियमानुसार सात दिवसांत लावणे शक्य नसल्याचे त्यांनी मान्य केले. मुंबईतील ९४ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून येणाऱ्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी आम्ही संबंधित पोलीस ठाण्याकडून सातत्याने ना हरकत प्रमाणपत्र मागत असतो. तथापि वेगवेगळ्या सणांच्या बंदोबस्ताअभावी त्यांच्याकडून परवानगी देण्यास विलंब होत असतो. राजावाडी-कुपर व जे.जे. येथील शवागारांचे नूतनीकरण झाले असून तेथे नवीन रॅक्स करण्यात आले आहेत. तेथे कोठेही जमिनीवर मृतदेह नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कामगारांची संख्या तसेच लिपिकांची नऊ पदे रिक्त असल्याचेही पाटील यांनी सांगितले. तसेच पिण्याच्या पाण्यापासून सर्व सोयी कामगारांसाठी उपलब्ध असल्याचा दावाही त्यांनी केला.

हातमोजे, मास्क आदी गोष्टींचा पुरेसा साठा असून कामगारांना तो उपलब्ध करून दिला जातो. तसेच आरोग्याची तपासणीही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कामगारांनी आपली नियमित आरोग्य तपासणी करून घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले. कामगारांच्या ज्या काही मागण्या असतील त्या सोडविणे आवश्यक असून, त्यांना ज्या गोष्टींची गरज आहे त्या सर्व गोष्टी देण्यासाठी मी पाठपुरावा करीन, असे आश्वासनही त्यांनी दिले.