कोल्हापूरातील कुस्तीपटू निलेश कंदूरकरची मागच्या सहा दिवसांपासून मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे. आज सकाळी पहाटे चारच्या सुमारास त्याने कराडच्या कृष्णा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.  कोल्हापूरातील बांदिवडे गावात कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी प्रतिस्पर्धी कुस्तीपटूशी झुंज सुरु असताना एका डावात निलेशच्या मानेला गंभीर दुखापत झाली.

रिंगणामध्येच कोसळलेल्या निलेशला कोल्हापूरच्या मेट्रो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण तिथे त्याच्या प्रकृतीत फारशी सुधारणा होत नसल्याने कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी त्याला मुंबईत हलवण्याचा निर्णय घेतला होता. त्याला मुंबईला आणत असताना प्रकृती अधिकच खराब झाल्याने त्याला कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. अखेर आज पहाटे चारच्या सुमारास निलेशची प्राणज्योत मालवली.