डॉ. जब्बार पटेल

साधू यांच्या ‘मुंबई दिनांक’ कादंबरीत राजकीय विश्लेषण, राजकारणातील गुंतागुंत, मानवी भावभावना हे विश्लेषणात्मक तर ‘सिंहासन’ कादंबरीत ते भाष्य म्हणून प्रकट होते. ‘सिंहासन’ कादंबरीवर चित्रपट करायचा विचार आहे, असे साधू यांना सांगितले. तेव्हा माझ्या कलाकृतींवर चित्रपटासाठी मी लिहिण्यापेक्षा ते विजय तेंडुलकर यांच्याकडून लिहून घेतले तर अधिक चांगले होईल, असे त्यांचे म्हणणे होते. त्याप्रमाणे तेंडुलकरांना विचारले आणि त्यांनीही होकार दिला. साधू यांचे माणूस म्हणून मोठेपण आहे. स्वत: उत्तम लेखक असताना आणि स्वत:च्याच कादंबऱ्यांवर चित्रपट निघत असतानाही त्याचे लेखन स्वत: करण्याचा हट्ट न धरता अन्य मोठय़ा लेखकाकडून ते करून घ्यायला सांगणे खूप महत्त्वाचे वाटते. तेंडुलकर यांच्यासारख्या दिग्गज लेखकानेही साधू यांच्या लेखनातील पात्रे व आशयाला कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी घेत ‘सिंहासन’चे लेखन केले.

साधू यांच्या या दोन्ही कादंबऱ्या त्यांचे राजकीय भान, निरीक्षण आणि समज अधोरेखित करणाऱ्या आहेत. राजकीय विषयावरील कादंबरी लेखनाचा नवा मापदंड या दोन कादंबऱ्यांनी मराठी साहित्यात निर्माण केला. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मंत्रालयात या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यासाठी खास परवानगी दिली. सत्तास्पर्धा, महाराष्ट्राच्या राजकारणाचे प्रतिबिंब आणि एका मुख्यमंत्र्यांच्या विरोधात अर्थमंत्र्यांनी केलेले बंड असे चित्रपटाचे स्वरूप होते. मात्र तरीही पवार यांनी परवानगी दिली. त्यांच्या परिचित मंत्र्यांचे बंगलेही चित्रीकरण करण्यासाठी उपलब्ध करून दिले.

‘सिंहासन’मधील ‘विधानसभा’ कामकाजाचे चित्रीकरण पुण्यात झाले. विधानसभेचे प्रत्यक्ष कामकाज कसे चालते याची एक पत्रकार म्हणून साधूंना जवळून ओळख होती. चित्रपटात विधानसभेच्या कामकाजाचे योग्य चित्रीकरण व्हावे, चुकीच्या पद्धतीने ते होऊ नये त्यासाठी पुण्यातील चित्रीकरणाच्या वेळी साधू उपस्थित होते. योग्य व बिनचूक चित्रीकरण कसे होईल याची त्यांनी काळजी घेतली. विधानसभेच्या कामाची एक विशिष्ट पद्धत व आब (डिग्निटी) असतो. चित्रपटात त्याला कुठेही धक्का पोहोचणार नाही याची जाणीव त्यांनी ठेवली. मराठीतील राजकीय कादंबरी लेखनात साधू यांच्या ‘सिंहासन’ व ‘मुंबई दिनांक’ या दोन्ही कादंबऱ्या नेहमीच अग्रस्थानी आहेत आणि राहतील.

कथा लेखक, कादंबरीकार म्हणूनही ते मोठे होते. पत्रकारितेत असल्याने सर्व राजकारण त्यांनी जवळून पाहिले होते. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनात उमटले पण ते रूक्ष झाले नाही. साहित्यातील सौंदर्य व लालित्य त्यांच्या सर्व लेखनात होते. जे राजकारण जवळून पाहिले त्यातील व्यक्तिरेखांचा अचूक वापर त्यांनी राजकीय कादंबरी लेखनात केला. ‘विप्लवा’ या कादंबरीत त्यांनी परग्रहावरून पृथ्वीवर आलेल्या प्रवाशांची गोष्ट मांडली. त्यांच्या लेखनात जागतिक भानही होते. महाराष्ट्रात, देशात, आशियाई खंडात काय चालले आहे, जागतिक पातळीवर काय बदल होत आहेत, काय नवीन घडत आहे यावर त्यांचा अभ्यास व निरीक्षण होते. ते त्यांच्या लेखनातून प्रतिबिंबित होत असे. ही सर्व मांडणी तर्कनिष्ठ  पद्धतीने लेखनातून व्यक्त व्हायची. सामाजिक व राजकीय भान त्यांच्या सर्व लेखनात होते. ते काळाचा वेध घेणारे द्रष्टे लेखक होते. भविष्यकाळातील चिन्हे त्यांच्या लेखनात पाहायला मिळायची. त्यांच्या बहुतांश कथा व कादंबरी लेखनातून महिलांचे प्रश्न मांडले गेले. स्त्री व्यक्तिरेखांबाबतचा त्यांचा दृष्टिकोन आधुनिक व अभ्यासनीय होता. त्याची मांडणीही ते वेगळ्या पद्धतीने करायचे.  ‘पडघम’ हे साधू यांचे एक अप्रतिम संगीत नाटक आहे. विद्यार्थी संघटना, त्यांचे राजकारण, विद्यार्थी नेतृत्व यावर त्यांनी यात भाष्य केले होते. विद्यार्थी नेताही शेवटी या सत्तेच्या राजकारणाचा, व्यवस्थेचा कसा भाग होतो हे त्यांनी त्यात मांडले होते. ‘पडघम’ म्हणजे पारंपरिक रंगमंचावरील ‘पथनाटय़’ स्वरूपातील एक आगळा आणि वेगळा आविष्कार होता.

साधू यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली. ‘सिंहासन’नंतर मी केलेल्या काही माहितीपटांचे लेखनही त्यांनी केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील तसेच अलीकडेच प्रदर्शित झालेल्या यशवंतराव चव्हाण यांच्यावरील चित्रपटासाठी लेखन, पटकथा स्वरूपात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. साधू यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व मवाळ, ऋजू होते. त्यांचे भाषणही प्रेक्षकांशी संवाद साधत, गप्पा या स्वरूपाचे असायचे. पण तरीही त्यांच्या भाषणात साहित्यिक दर्जा व मूल्य असायचे. भाषणाच्या ओघात ते असे काही मार्मिकपणे बोलायचे की त्यातून त्यांची ‘भूमिका’ समोरच्यांना कळायची. ‘जनस्थान’ पुरस्कार वितरणाच्या वेळी त्यांनी भाषणात व्यक्त केलेली ठोस व ठाम भूमिका आजही स्मरणात आहे. ते जी भूमिका घ्यायचे त्याच्याशी ते ठाम असायचे. साधू व माझे नाते जिव्हाळ्याचे होते. त्यांच्या मुंबईतील घरी जाणे व्हायचे. त्यांचे संपूर्ण कुटुंब (पत्नी, दोन्ही मुली, जावई) नेहमीच त्यांच्या पाठीशी असत. एक सुंदर व आदर्श असे त्यांचे कुटुंब होते.

‘सिंहासन’ चित्रपटात जे राजकारण दाखविले होते त्यात नंतरच्या काळात खूप बदल झाला. आमची भेट झाली की ‘सिंहासन’सारखा सध्याच्या राजकारणावर चित्रपट तयार व्हावा अशी चर्चा व्हायची. बघू या. तसे काही करता आले तर ती साधू यांना श्रद्धांजली असेल.