क्षितिज पटवर्धन लेखक, गीतकार

वाचनाची आवड लहानपणापासूनच होती. त्या वेळी ‘चांदोबा’, ‘चंपक’, ‘ठकठक’ या लहान मुलांच्या मासिकांची दर महिन्याला वाट पाहायचो, पण दहावीच्या सुट्टीपासून वाचनाची खरी गोडी लागली. त्या सुट्टीत पुस्तकांचे भरपूर वाचन केले. कोथरुड येथे असलेल्या ‘साधना कलामंच’च्या ग्रंथालयातून ‘स्वामी’, ‘ययाती’, ‘झाडाझडती’, ‘शंभर मराठी कविता’ अशी विविध पुस्तके वाचली. ११ वी ते १२ वी मध्ये ‘विश्वास ग्रंथालय’, ‘पुणे मराठी ग्रंथालय’च्या माध्यमातून दि. बा. मोकाशी, अनंत काणेकर, विद्याधर पुंडलिक, जी. ए. कुलक र्णी आणि इतरही लेखकांची पुस्तके वाचली.

महाविद्यालयात असतानाच एकांकिका, नाटकाशीही जोडला गेलो. त्यामुळे एखादी कथा, कादंबरी वाचताना त्यात एकांकिका किंवा नाटकाचे बीज आहे का, याचाही विचार मनात सुरू असायचा. पुढे पुण्यातील ‘रानडे इन्स्टिटय़ूट’मधून ‘मास्टर इन कम्युनिकेशन अ‍ॅण्ड जर्नालिझम’ केले. तेव्हा रानडेच्या ग्रंथालयातून कथा/कादंबरीबाह्य़ विषयांवरील पुस्तकांचे, विशेषत्वाने इंग्रजी पुस्तकांचे, वाचन मोठय़ा प्रमाणात झाले. जाहिरात, छायाचित्रण, छायाचित्रण-पत्रकारिता या विषयांवरील पुस्तकांचा यात समावेश होता. मराठीसह इंग्रजी पुस्तकांच्या वाचनाने माझी समज वाढायला मदत झाली. माझा मित्र अनिश जोग याच्याकडे जाहिरातींवरील पुस्तकांचा संग्रह आहे. येथे जाहिरातींच्या ‘इयर बुक’सह काही पुस्तकांचे तसेच ‘सेतू जाहिरात कंपनी’तही जाहिरात विषयांवरील पुस्तकांचे वाचन झाले. आत्तापर्यंत जे वाचत होतो त्यात शब्द महत्त्वाचे होते. जाहिरातविषयक पुस्तकांतून शब्दांपेक्षा दृश्य, चित्र यांचे महत्त्व काय आहे ते कळले. वेगवेगळ्या कवींची मराठी व हिंदूी कवितांची पुस्तकेही वाचली.

लहानपणी जे काही वाचले त्या सर्वाचा मला आता काम करताना प्रचंड फायदा होत आहे. काहीही लिहिण्याआधी तुम्ही स्वत:नेही वाचलेले असले पाहिजे. त्या वाचनाचा तुम्हालाच पुढे उपयोग होत असतो. ह. मो. मराठे यांच्या ‘न्यूज स्टोरी’ या काही वर्षांपूर्वी वाचलेल्या कथेवरूनच मला पुढे ‘दोन स्पेशल’ नाटकाचे बीज सुचले. पुस्तकांच्या वाचनातून प्रेरणा, स्फूर्ती मिळते. मला पुस्तके परत परत वाचायला आवडतात. त्यामुळे नव्या पुस्तकांबरोबरच याआधी वाचून झालेली पुस्तकेही अधूनमधून वाचत असतो. जी. ए. कुलकर्णी यांची पुस्तके वाचून एक विलक्षण अनुभूती मिळते. ती नेमक्या शब्दांत सांगता येणार नाही. ‘पुलं’च्या लेखनातून जगण्याचा दृष्टिकोन व सकारात्मक प्रेरणा मिळाली. रोजच्या जगण्यातील मजा व गंमत यातून कळली. लोकांच्या भावभावना, त्यांचे स्वभाव, वेगवेगळी पात्रे पुलंच्या पुस्तकातून वाचायला मिळाली. अ‍ॅलेक पदमसी यांच्या ‘ए डबल लाइफ- अ‍ॅडव्हर्टायझिंग अ‍ॅण्ड थिएटर’ या पुस्तकाचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. नावीन्यपूर्ण कल्पना सुचायला, कल्पनाशक्तीचा विकास व्हायला त्यामुळे मदत झाली.

इयत्ता ८ वी ते १० वी या तीन वर्षांत मो. रा. वाळिंबे लिखित ‘सुगम मराठी व्याकरण लेखन’ या पुस्तकाचे वाचन केले. मराठीतील सर्व भाषाप्रकार, मात्रा, वृत्त, अलंकार त्यामुळे कळण्यास मदत  झाली. श्याम मनोहर यांचीही पुस्तके वाचली आहेत. त्यांची लेखनशैली वेगळ्या प्रकारची आहे. सध्या मुरलीधर खैरनार यांच्या ‘शोध’ या मराठी तर आर. के. नारायण यांच्या ‘गाइड’ या इंग्रजी पुस्तकाचे वाचन सुरू आहे. मला आत्मचरित्रांचेही वाचन करायला आवडते. आत्मचरित्रात्मक पुस्तकांतून प्रेरणा मिळते. त्या माणसांचा जीवनप्रवास कळतो. ‘नाथ हा माझा’, ‘लमाण’, ‘बॅरिस्टरचे कार्ट’ आदी काही आत्मचरित्रात्मक पुस्तके तसेच नाटकांची पुस्तकेही खूप वाचली आहेत.

स्मार्ट भ्रमणध्वनी, संगणक, माहितीचे महाजाल आणि सामाजिक माध्यमांमुळे सध्याच्या पिढीचे वाचन कमी होत चालले आहे ही बाब खरी आहे. पण याचे खापर या आधुनिक तंत्रज्ञानावर फोडून चालणार नाही. आधुनिक तंत्रज्ञानाशी स्पर्धा करतील अशा प्रकारची नावीन्यपूर्ण पुस्तके मोठय़ा प्रमाणात येण्याची गरज आहे. काही अपवाद वगळता अशी पुस्तके प्रकाशित होताना दिसत नाही. ‘दर्या’ या ग्राफिक कादंबरीचा आगळा प्रयोग आम्ही यंदा करतोय. दीडशे पानांच्या या पुस्तकात ६० ते ७० ग्राफिक्स असतील. लहानांपासून ते मोठय़ांपर्यंत सर्वानाच हे पुस्तक आवडेल. मुलांमध्ये लहानपणीच वाचनाची गोडी निर्माण केली पाहिजे. यात आई-वडील, शिक्षक यांचाही महत्त्वाचा वाटा आहे. एकदा का वाचनाची आवड निर्माण झाली, गोडी लागली की ती पुढेही कायम राहते.

पुस्तके म्हणजे एखाद्या बंद खजिन्याच्या दरवाजाच्या कुलपाला असलेली किल्ली आहे. तुम्ही जेव्हा ते कुलूप उघडता तेव्हा तुमच्यासमोर विविध विषयांचा अक्षरश: शब्दखजिना उघडला जातो. पुस्तके तुम्हाला विचारांची, जगण्याची दृष्टी आणि भान देतात. ऐतिहासिक पुस्तके वाचून तुम्हाला आजच्या वर्तमानाचे भान मिळू शकते. स्त्रियांचे प्रश्न मांडणारी पुस्तके वाचून स्त्रिया व महिलांच्या जीवनाकडे पाहण्याची, त्यांचे प्रश्न समजून घेण्याची दृष्टी मिळते. एकूणच पुस्तक वाचनातून जे मिळते ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. पुस्तके तुमची मित्र असतात. पुस्तके तुमची अखेपर्यंत साथ करतात.