नूतनीकरणाचे काम करणाऱ्या संस्थेला नोंदीची माहितीच नाही

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या संकेतस्थळावरील साहित्यिकांच्या जन्म-मृत्यू नोंदणीची अचूक माहिती ‘मसाप’ने संकेतस्थळाच्या नूतनीकरणाचे काम करणाऱ्या संस्थेकडे अद्याप दिलेली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘मसाप’च्या संकेतस्थळावर ‘कार्यक्रम’ असा विभाग असून त्यात साहित्यिकांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची माहिती देण्यात आली होती. मात्र त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वि. स. खांडेकर, अण्णा भाऊ साठे यांच्याबाबतच्या चुकीच्या नोंदी देण्यात आल्या होत्या. जागरूक साहित्यप्रेमी अमेय गुप्ते यांनी ‘मसाप’चे लक्ष याकडे वेधले होते. याविषयी ‘मसाप’चे अध्यक्ष रावसाहेब कसबे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी या चुका सुधारल्या जातील, असे सांगितले होते. मात्र तीन-चार महिन्यांनंतरही या चुकांची दुरुस्ती करण्यात आलेली नव्हतीच पण संकेतस्थळावरून या नोंदीचे पानही काढून टाकण्यात आले होते. त्यावेळी ‘मसाप’चे कार्यवाह मिलिंद जोशी यांना विचारले असता, संकेतस्थळ अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. तसेच कार्यक्रमांच्या संख्येतही वाढ झाली आहे. जन्म-मृत्यूच्या नोंदीत झालेली चूक लवकरच दुरुस्त केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली होती.

‘मसाप’च्या संकेतस्थळ नूतनीकरणाचे काम ‘साहित्य सेतू’ ही संस्था करत आहे. याविषयी तिथे चौकशी केली असता संस्थेचे संस्थापक प्रा. क्षितिज पाटुकले यांनी साहित्यिकांच्या जन्म-मृत्यूंची अचूक नोंद आम्हाला उपलब्ध झाली की आम्ही ती सुधारणा करू, असे सांगितले. म्हणजे ‘मसाप’कडून अद्यापही या नोंदी दिल्या गेल्या नाहीत का? या प्रश्नावर थेट उत्तर देण्याचे टाळून संपूर्ण संकेतस्थळाची फेररचना आणि नूतनीकरण केले जाणार आहे. आम्ही हे काम कोणतेही मानधन न घेता करत आहोत, असे उत्तर पाटुकले यांनी दिले.   ‘मसाप’च्या निदर्शनास ही चूक आणून देणारे अमेय गुप्ते यांनी नगरपालिका/महानगरपालिका यांच्याकडून संबंधित साहित्यिकांच्या जन्म-मृत्यूच्या नोंदणीचे अधिकृत दाखले मिळविले आहेत. या दाखल्यांच्या प्रती त्यांनी ‘मसाप’कडे सुपूर्दही केल्या आहेत. मात्र तरीही हा वेळकाढूपणा केला जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

‘मसाप’च्या संकेतस्थळ नूतनीकरणाचे काम ‘साहित्य सेतू’ ही संस्था करत आहे. जन्म-मृत्यू नोंदी सुधारण्याबाबत येथे चौकशी केली असता संस्थेचे संस्थापक प्रा. क्षितिज पाटुकले यांनी साहित्यिकांच्या जन्म-मृत्यूंची अचूक नोंद आम्हाला उपलब्ध झाली की आम्ही ती सुधारणा करू, असे सांगितले. आम्ही हे काम कोणतेही मानधन न घेता करत आहोत, असे उत्तर पाटुकले यांनी दिले.