माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या (दहावी) उत्तर पत्रिका तपासणाऱ्या परीक्षकांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने   पाठविलेल्या मार्गदर्शक हस्तपुस्तिकेच शुद्धलेखनाच्या अनेक चुका आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय सचिवांना लिहिलेल्या पत्रात या चुकांचा पाढा वाचण्यात आला आहे.
सध्या परीक्षक दहावीच्या उत्तर पत्रिका तपासीत आहेत. त्यासाठी मंडळाने त्यांच्यासाठी वेळापत्रकही आखून दिलेले आहे. तीन तासांच्या २० ते २५ उत्तर पत्रिका दरदिवशी तपासणे परीक्षकांना बंधनकारक आहे. अडीच तासांच्या २५ ते ३० उत्तरपत्रिका तर दोन तासांच्या ३५ ते ४५ उत्तर पत्रिका रोज तपासल्या गेल्या पाहिजेत, असा दंडक मंडळाने घालून दिलेला आहे. तीन तासांच्या उत्तर पत्रिकेसाठी सव्वा चार रूपये, अडीच तासांच्या उत्तर पत्रिकेसाठी साडेतीन रूपये तर दोन तासांच्या उत्तर पत्रिकेसाठी अडीच रूपये मानधन परीक्षकांना दिले जाते. एक तासाच्या उत्तर पत्रिकेसाठी पावणे दोन रूपये दर दिला जातो. परीक्षकांनी दिलेल्या उत्तरपत्रिका दहा दिवसात  तपासून परत कराव्यात असा मंडळाचा दंडक आहे. मात्र मंडळ या उत्तर पत्रिका टपालाने पाठवितात. त्यात दोन-तीन दिवस जातात. शिवाय रविवार अथवा सार्वजनिक सुट्टीही गृहीत धरली जात नाही. त्यामुळे शिक्षकांच्या हाती उत्तर पत्रिका तपासण्यासाठी अवघे पाच
 ते सहा दिवसच उरतात. त्यामुळे प्रत्यक्षात मंडळाने ठरवून दिलेल्या कोटय़ापेक्षा जास्त उत्तर पत्रिका त्यांना तपासाव्या लागतात.