अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना घेऊन नातेवाईकांची केईएममध्ये धाव

पक्षाघात झालेल्या कोणत्याही रुग्णाला बरे करणारे यंत्र परळच्या केईएम रुग्णालयात पुन्हा सुरू झाल्याचा चुकीचा संदेश समाज माध्यमांवर पसरला आणि अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना घेऊन त्यांचे नातेवाईक रुग्णालयात धाव घेऊ लागले आहेत. पक्षाघातानंतर पहिल्या २४ तासांतच केईएममधील केंद्रात उपचार केले जात असल्याची माहिती मिळाल्यावर रुग्णांचे नातेवाईक निराशेने माघारी जात आहेत.

केईएममध्ये १० ऑक्टोबरला अत्याधुनिक पक्षाघात केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी अ‍ॅन्जिओग्राफीची शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेले ‘बायप्लेन डिजिटल सबट्रॅक्शन अ‍ॅन्जिओग्राफी’ हे यंत्र केईएमच्या मेंदूशल्यचिकित्सा (न्यूरोसर्जरी) विभागात नव्याने सुरू केल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर समाज माध्यमांवर चुकीचे संदेश फिरू लागले.

सर्वसाधारणपणे पक्षाघाताचा झटका आल्यानंतर पहिल्या साडेचार तासांमध्ये इंजेक्शनचा वापर करून रक्तातली गुठळी विरघळवली जाते. परंतु तीव्र झटका आल्यास किंवा रक्तातील गुठळीचे स्वरूप मोठे असल्यास ती विरघळणे अवघड असते. काही वेळेस रुग्णांना साडेचार तासांत रुग्णालयात घेऊन येणे शक्य नसते. अशा परिस्थितीमध्ये अ‍ॅन्जिओग्राफी करून ही गाठ काढली जाते. खरे तर केईएम रुग्णालयात अडीच वर्षांपासून अ‍ॅन्जिओग्राफीची सुविधा आहे. यासाठी ‘सिंगलप्लेन डिजिटल सबट्रॅक्शन अ‍ॅन्जिओग्राफी’ यंत्र वापरले जाते. या शस्त्रक्रिया अधिक चांगल्या रीतीने करण्यासाठी बायप्लेन यंत्र नव्याने बसविले आहे. परंतु या यंत्राबाबतची माहिती चुकीच्या पद्धतीने व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकवर पसरली. त्यातूनच पक्षाघाताचा रुग्ण नव्या यंत्राद्वारे केलेल्या उपचाराने बरा होत असल्याचा गैरसमज पसरला. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकही रुग्णांना घेऊन केईएममध्ये आशेने येत आहेत.

माझ्या सासूबाई सुरतला राहतात. त्यांना पक्षाघाताचा झटका येऊन तीन दिवस झाले असून सुरतमध्येच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. झटका आलेले रुग्ण बरे करण्याचे नवीन यंत्र केईएममध्ये असल्याची माहिती फेसबुकवर मिळाली. त्यामुळे सासूबाईंना सुरतहून केईएममध्ये आणण्यासाठी धडपड करीत होतो, परंतु मुंबईच्या मित्राने ही माहिती चुकीची असल्याचे सांगितले, असे धुळ्यातील पशूवैद्यक सुनील पाटील यांनी सांगितले.

केईएममधील मज्जातंतू विभागाच्या प्रमुख डॉ. संगीता रावत म्हणाल्या की, केंद्र सुरू झाल्यापासून अनेक लोक  रुग्णांना घेऊन येत आहेत. चुकीच्या संदेशामुळे हे घडत आहे. त्यांना समजावून परत पाठवावे लागत आहे.

२४ तासांतच उपचार आवश्यक

पक्षाघाताचा झटका आल्यानंतर पहिल्या साडेचार तासांत जवळच्या कोणत्याही रुग्णालयात नेल्यानंतर इंजेक्शन देऊन रक्तातली गुठळी विरघळवली जाते. परंतु ज्या रुग्णांवर पहिल्या साडेचार तासांत उपचार होऊ शकत नाहीत, अशांवर पहिल्या २४ तासांत उपचार करून रक्तगुठळी विरघळवण्याचे उपचार केईएममध्ये करण्यात येतात.

जिल्ह्य़ांमध्येही उपचार शक्य

केईएममध्ये अ‍ॅन्जिओग्राफीसाठी असलेले यंत्र मोठय़ा सरकारी किंवा खासगी रुग्णालयातही असते. पक्षाघातावरील उपचारांमध्ये वेळ हा महत्त्वाचा घटक आहे. मुंबई किंवा आसपासच्या भागांतील रुग्णांना केईएममध्ये आणता येते. परंतु परराज्य किंवा मुंबईपासून दूरच्या जिल्ह्य़ातील रुग्णाला तेथेच उपचार मिळणे आवश्यक असते. त्यासाठी मुंबईला येण्याची आवश्यकता नाही, असे डॉ. संगीता रावत यांनी सांगितले.