दक्षिण मुंबईतील वाहनतळांबाहेर बेशिस्तपणे वाहने उभी करण्याचे प्रकार; पालिकेचे नियंत्रण नसल्याने गोंधळ

कंत्राटदारांच्या मनमानी कारभाराला लगाम घालण्याकरिता कुलाबा, फोर्ट परिसरातील तब्बल ३९ वाहनतळांवर वाहने विनाशुल्क उभी करण्याची परवानगी महानगरपालिकेने दिल्याने या परिसरात कामानिमित्त येणाऱ्यांच्या वाहनांमागील ‘शुल्क’काष्ठ मिटले आहे. मात्र, या वाहनतळांची व्यवस्था पाहणारे कुणी नसल्याने वाहने बेशिस्तपणे उभी करणे, पदपथांवर अतिक्रमण करणे असे प्रकार वाहनचालकांकडून घडत आहेत. याचा फटका येथून ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांना बसत आहे. पदपथांच्या तोंडावर उभ्या केलेल्या गाडय़ांमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे भाग पडते आहे. तर वाहनासमोर दुसरी गाडी लावून पसार झालेल्या चालकाची वाट पाहण्याची वेळ अनेकांवर येत आहे. आता तात्पुरता उपाय म्हणून आपल्या काही कर्मचाऱ्यांना वाहनतळाच्या देखरेखीसाठी ठेवण्याच्या पर्यायाचा विचार पालिका करत आहे.

वाहनतळांचे कंत्राट संपूनही वाहनचालकांकडून मनमानीपणे शुल्क वसूल केले जात असल्याचे लक्षात आल्यावर ‘ए’ वॉर्डमधील तब्बल ३९ वाहनतळ पालिकेने चालकांकरिता मोफत खुली करून दिली. तसे फलकही वाहनतळांवर लावले गेले. यामुळे या वाहनतळांवर सध्या ७ हजार १४६ वाहने मोफत उभी करता येत आहेत. यात ४ हजार ९२४ चारचाकी, तर २ हजार २२२ दुचाकी वाहनांचा समावेश आहे. दररोज दक्षिण मुंबईत येत असलेल्या हजारो वाहनचालकांना या मोफत वाहनतळांचा फायदा मिळत आहे. वाहनतळांच्या निविदांना योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याने आणखी किमान सहा महिने तरी या ठिकाणी चालकांना आपली वाहने मोफत उभी करता येतील. मात्र मोफत वाहनतळांचा फायदा घेणारे वाहनचालक वाहने बेशिस्तपणे लावत आहेत. त्याचा नाहक त्रास पादचाऱ्यांना सोसावा लागत आहे.

चर्चगेट, फोर्ट परिसरात हजारो कर्मचारी पदपथांवरून चालत रेल्वेस्थानक गाठतात. मात्र वाहनतळांवरील गाडय़ा दोन पदपथांमधील रस्त्यांवर आडव्या लावल्या जात असल्याने पदपथावर नीट चालताच येत नाही. चर्चगेटकडून एलआयसीच्या दिशेने जाताना येणारी खाऊ गल्ली, एलआयसीसमोरही पदपथांच्या तोंडावर गाडय़ा उभ्या करून चालक निघून जातात. फोर्ट विभागातही हीच स्थिती आहे. क्रॉफर्ड मार्केटसारख्या गर्दीच्या ठिकाणी तर हा त्रास अधिक गंभीर स्वरूप घेत आहे. गाडय़ा लावण्यासाठी कमी जागा असल्याने फोर्ट विभागात तर गाडय़ा एकासमोर एक उभ्या केल्या जातात. त्यामुळे आधी गाडी उभी करून गेलेल्या चालकाला समोरची गाडी हटवेपर्यंत वाट पाहावी लागते. पूर्वी कंत्राटदारांमुळे वाहन लावण्याच्या पद्धतीत शिस्त तरी होती. आता मात्र वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोफतचा तापच जास्त होऊ लागला आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

ए वॉर्डमधील आठ वाहनतळांवर शुल्क घेतले जाते तर ३९ वाहनतळ कंत्राटदारांची नियुक्ती होईपर्यंत मोफत ठेवले आहेत. वाहनचालकांनी थोडी शिस्त पाळून गाडय़ा उभ्या केल्या तर या सेवेचा लाभ सर्वानाच घेता येईल. वॉर्डमधील कर्मचाऱ्यांना अशा बेशिस्त वाहनचालकांवर लक्ष ठेवून पदपथ मोकळे करण्यासाठी सांगितले जाईल.

– किरण दिघावकर, साहाय्यक आयुक्त, ए वॉर्ड

मी मॅक्सम्युलर भवनसमोरच्या वाहनतळावर २१ सप्टेंबर रोजी गाडी लावली होती. दुपारी साडेचारच्या सुमारास परतल्यावर एक मर्सडिीज माझ्या गाडीसमोर आडवी लावली होती. त्यामुळे रस्त्याचाही काही भाग अडवला गेला होता.  वाहतूक पोलिसांना कळवल्यावरही कोणी आले नाही. अखेर ५.२० वाजता गाडीचा मालक आला.

– मेघना हरिदास, एक वाहनधारक