एका रुग्णाला ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’ असा चुकीचा अहवाल देणाऱ्या पॅथेलॉजी लॅबच्या मालकाला चारकोप पोलिसांनी अटक केली. मालाड येथील राजेंद्र मेहरा आणि त्यांची पत्नी गीता मेहरा पॅसिफिक लॅब ही खाजगी पॅथेलॉजी लॅब चालवतात.
दहा दिवसांपूर्वी जोएल चेट्टीयार (३८) हे या लॅबमध्ये रक्ताच्या तपासणी करण्यासाठी गेले होते. तीन दिवसांनंतर त्यांच्या हातात अहवाल पडल्यावर त्यांना धक्का बसला. यात त्यांना ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह’ असल्याचे दाखविण्यात आले होते. चेट्टीयार यांनी यानंतर खात्री करुन घेण्यासाठी सरकारी तसेच दुसऱ्या खाजगी पॅथेलॉजी लॅबमधून तपासणी करून घेतली तेव्हा ते ‘एचआयव्ही नेगेटिव्ह’असल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी शनिवारी चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून आम्ही मेहरा दांपत्याविरोधात गुन्हा दाखल केला असून राजेंद्र मेहरा यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना ९ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, असे चारकोप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद कोळी यांनी सांगितले.