शैलजा तिवले

करोना संसर्गाचे वेळेत निदान आणि उपचार करण्यासाठी क्ष-किरण चाचणी इतर चाचण्यांच्या तुलनेत प्रभावी आहे. तीची अचुकता ९९ टक्के असल्याचे निरीक्षण वरळी येथील नॅशनल स्पोर्ट क्लबमधील (एनएससीआय) करोना आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी नोंदविले आहे. याबाबत संशोधनात्मक अभ्यासही करण्यात आला असून लवकरच तो प्रकाशितही करण्यात येणार आहे.

सध्या रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलीमरेज् चेन रिएक्शन (आरटीपीसीआर) या तंत्रज्ञानाद्वारे करोना चाचणी केली जाते. या चाचणीला किमान तीन ते चार तास लागतात आणि  अहवाल येण्यास सर्वसाधारणपणे एक ते दोन दिवस लागतात. परिणामी, निदान उशिरा झाल्याने रुग्णाच्या उपचारास विलंब होतो.

करोना विषाणूचा संसर्ग मुख्यत्वे फुप्फुसांमध्ये होतो. त्यामुळे संसर्गाचे प्रमाण क्ष-किरण चाचणीद्वारे फुप्फुसामध्ये स्पष्ट दिसते. सुरूवातीला ‘एनएससीआय’मध्ये रुग्ण दाखल झाले, त्यावेळी प्रामुख्याने लक्षात आले. त्यामुळे नंतर आलेल्या प्रत्येक रुग्णाची क्ष-किरण चाचणी करण्यात आली. त्यामुळे उपचारांना योग्य दिशा मिळत गेली, असे एनसीआय केंद्र उभारण्यास हातभार लावणारे डॉ. मुफज्जल लकडावाला यांनी सांगितले.

क्ष-किरण चाचणीच्या महत्त्वाबाबत ‘एनएससीआय’च्या वरिष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. नीता वर्टी म्हणाल्या, ‘ही चाचणी करण्यास काही मिनिटे लागतात. सीटी स्कॅन किंवा अन्य चाचण्यांच्या तुलनेने ही चाचणी कमी खर्चिक आहे. तसेच रुग्णाच्या चाचणीनंतर हे यंत्र र्निजतुक करणे सीटी स्कॅनच्या तुलनेत सोपेही आहे. तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये ‘आरटीपीसीआर’चा अहवाल येण्याआधीच संसर्गाचे निदान क्ष-किरण चाचणीने करता आले. त्यामुळे रुग्णांवर तातडीने उपचार करण्यात मदत झाली. अनेकदा रुग्णांना तीव्र लक्षणे नसताही क्ष-किरण चाचणीमध्ये संसर्ग अधिक प्रमाणात असल्याचेही आढळले. यातून संभाव्य गंभीर रुग्णांचे निदानही वेळेआधी करणे शक्य झाले. रुग्णाला ऑक्सिजनची किंवा अतिदक्षता विभागाची आवश्यकता भासणार असल्याने तशी व्यवस्था करणेही सोपे गेले. इथे आलेल्या प्रत्येक रुग्णाची आम्ही क्ष-किरण चाचणी करतो. या चाचणीच्या आधारे उपचारांची दिशाही निश्चित करण्यात मदत होते.’

रुग्णाला घरी सोडतानाही चाचणी

करोना चाचण्यांच्या बदलत्या नियमावली बाबत बोलताना वरिष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. नीता वर्टी म्हणाल्या, दहाव्या दिवसानंतर लक्षणे नसल्यास चाचणी न करता घरी पाठविण्याच्या सूचना ‘आयसीएमआर’ आणि पालिकेने दिल्या आहेत. परंतु प्रसूती झालेल्या माता, कर्करुग्ण अशा जोखमीच्या गटातील व्यक्तींमध्ये संसर्ग असल्यास घरी पाठविणे धोक्याचे ठरू शकते, हे लक्षात घेऊन रुग्णांना घरी सोडतानाही क्ष-किरण चाचणी केली जाते.

तीन हजार चाचण्या

‘एनएससीआय’मध्ये आत्तापर्यंत किमान तीन हजार क्ष-किरण चाचण्या करण्यात आल्या आहेत. पोद्दार रुग्णालय, महापालिका आणि संस्थांच्या मदतीने केलेल्या क्षकिरण चाचण्यांचे अहवाल आणि प्रत्यक्ष आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल यांची पडताळणीही आम्ही केली आहे. त्यातून क्ष-किरण चाचणीची सुक्ष्म बदल नोंदवण्याची क्षमता ८९ टक्के आणि अचुकता ९९ टक्के असल्याचे आढळले. याबाबतचा संशोधन अभ्यासही लवकरच प्रकाशित केला जाणार असल्याचे डॉ. लकडावाला यांनी सांगितले.

संसर्ग तीव्रता ठरवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता

*   क्ष-किरण अहवालांच्या वर्गीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स- एआय) आधारित संगणक प्रणाली (सॉफ्टवेअर)चा वापर केला जातो.

*   महापालिकेच्या माध्यमातून क्लाऊडवर सर्व अहवाल अपलोड केले जातात.

*  संगणक प्रणालीच्या मदतीने काही मिनिटांत कमी, मध्यम आणि तीव्र असे अहवालांचे वर्गीकरण करता येते.

*   वर्गीकरणामुळे कमी वेळेत रुग्णाची प्रकृती किती गंभीर आहे, याचे निदान करण्यात मदत होते.

*   ‘क्ष-किरण चाचणी बस’च्या माध्यमातून सध्या झोपडपट्टी भागांत चाचण्या केल्या जात आहेत.

*   क्षयरोगाच्या चाचण्यांसाठी काही राज्यांमध्ये हे तंत्रज्ञान वापरले जाते.