कला आणि खेळातील प्रावीण्यासाठी दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अतिरिक्त गुणांना यंदा मुकावे लागण्याची शक्यता आहे. चित्रकला परीक्षा, क्रीडा स्पर्धा न झाल्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना लाभ मिळणार नसल्याचे दिसत आहे. दरम्यान अतिरिक्त गुणांसाठी प्रस्ताव सादर करण्यास राज्यमंडळाने मुदत वाढवून दिली आहे.

ललितकला, चित्रकला, लोककला खेळ यांतील प्रावीण्यासाठी विद्यार्थ्यांना दरवर्षी ५ ते २५ गुण देण्यात येतात. दरवर्षी हजारो विद्यार्थी या अतिरिक्त गुणांचा लाभ घेतात. अतिरिक्त गुण देण्याची सुरुवात झाल्यापासून दहावीला शंभर टक्के गुण मिळवणारेही विद्यार्थी आहेत. मात्र, यंदा अनेक विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण गमवावे लागण्याची शक्यता आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा चित्रकला परीक्षा झाल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर यंदा दहावीला असलेल्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी एलिमेंटरी किंवा इंटरमिजिएट परीक्षा दिली असल्यास त्यांना गुण देण्यात यावेत, अशी मागणी कला शिक्षकांनी केली आहे. त्याचप्रमाणे खेळांच्या जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धाही रद्द झाल्या. त्यामुळे गेली काही वर्षे विविध क्षेत्रांत प्रावीण्य मिळवूनही विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळण्यापासून वंचित राहावे लागणार आहे.

प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

यंदा परीक्षा एप्रिलअखेरीस होणार आहेत. त्यामुळे अतिरिक्त गुण मिळण्यासाठीचे प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्यमंडळाने घेतला आहे. कला आणि क्रीडा क्षेत्रातील प्रावीण्यासाठी अतिरिक्त गुण मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी यापूर्वी १५ जानेवारीपर्यंत मुदत होती. ती वाढवून आता १५ मार्च करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी शाळांकडे प्रस्ताव सादर करण्यास २७ फेब्रुवारीपर्यंत तर शाळांनी विभागीय मंडळाकडे प्रस्ताव सादर करण्यास १५ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे.