शहराला रोगाचा विळखा मात्र कायम

मुंबई : शहरातील क्षयरुग्णांची संख्या वाढत असताना कोणत्याही औषधांना दाद न देणाऱ्या (एक्सडीआर) क्षयरुग्णांच्या संख्येत प्रथमच सुमारे २० टक्के घट झाली आहे. हे चित्र आश्वासक असले तरी बहुतांश  औषधांना दाद न देणाऱ्या (एमडीआर) क्षयरोगाच्या रुग्णांची संख्या मात्र वाढतच असल्याचे मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीतून निदर्शनास येते.

२४ मार्च या ‘क्षयरोग दिना’च्या पाश्र्वभूमीवर पालिकेने मुंबईतील क्षयरोगाची स्थिती जाहीर केली. २०१८ मध्ये शहरातील क्षयरुग्णांची संख्या ४६ हजार ५१३ वर पोहचली. एक्सडीआर रुग्णांची संख्या गेल्या चार वर्षांत प्रथमच कमी झाली आहे. २०१७ मध्ये एक्सडीआरचे ६७० रुग्ण आढळले होते. २०१८ मध्ये त्यात घट होऊन संख्या ५२६ पर्यंत घटली आहे. एमडीआर रुग्णांची संख्या वाढतच आहे. २०१७ च्या तुलनेत २०१८मध्ये रुग्णसंख्येत ७८ची वाढ झाली आहे.

शहरात एमडीआरच्या रुग्णांचे निदान आणि उपचार वेळेत व्हावेत यासाठी पाच उपनगरीय रुग्णालयांमध्ये स्वतंत्र बाह्य़रुग्ण विभाग सुरू करण्यात आले आहेत. याशिवाय आणखी आठ एमडीआर बाह्य़रुग्ण विभाग सुरू करण्यात येणार आहेत. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त १५ ते ३१ मार्चदरम्यान पालिकेने विविध जनजागृतीपर कार्यक्रम हाती घेतले आहेत.

सहा नवीन जीनएक्सपर्ट यंत्रे

दाद न देणाऱ्या क्षयरोगाच्या निदानासाठी शहरात सध्या २८ जीनएक्सपर्ट यंत्रे कार्यरत असून या वर्षभरात नवीन सहा यंत्रे कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

मृतांच्या प्रमाणात २४ टक्के घट

पालिकेच्या आकडेवारीनुसार २०१३ ते २०१६ या चार वर्षांत शहरातील क्षयरुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण २४ टक्क्य़ांनी घटले आहे. असे असले तरी शहराला पडलेला क्षयरोगाचा विळखा घट्ट होत चालला आहे.

६०० रुग्णांवर बेडाक्युलीनचे उपचार

औषधांना दाद न देणाऱ्या क्षयरोगासाठी प्रभावी असलेले बेडाक्युलीन हे औषध शहरातील ५९६ रुग्णांना दिले असून त्यांच्यावरील उपचार यशस्वी झाले आहेत. काही रुग्णांना डेलामिनाईड हे औषधदेखील दिले जात आहे. केईएम येथे नवीन कल्चरल आणि डीएसटी लॅब सुरू होणार असल्याचे पालिकेने जाहीर केले आहे.

क्षयरोगाची आकडेवारी

 वर्ष    क्षयरुग्ण      एमडीआर रुग्ण        एक्सडीआर रुग्ण

२०१५   ३८६७७        ३६०८                       ५५६

२०१६   ४२११५        ४३७४                       ५५५

२०१७   ४५६७५        ४८९१                       ६७०

२०१८   ४६५१३        ४९६९                      ५२६

मृतांचे प्रमाण

वर्ष     मृतांची संख्या

२०१३   ७३९१

२०१४   ७०९०

२०१५   ६६८५

२०१६   ५६३४