अकरावी आणि बारावीला असलेली पर्यावरणशास्त्र विषयाची लेखी परीक्षा रद्द करण्यात आली असून, यानंतर प्रकल्पाच्या आधारे गुण देण्यात येणार आहेत.
देशभरात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अभ्यासक्रमांत पर्यावरण या विषयाचा समावेश करण्यात आला. यंदा पर्यावरण हा विषय ‘पर्यावरणशास्त्र आणि जलसुरक्षा’ असा करण्यात आला आहे. गेली दोन वर्षे नववी आणि दहावीच्या मूल्यमापन योजनेत बदल केल्यानंतर आता यंदा अकरावी आणि पुढील वर्षांपासून बारावीच्या मूल्यमापन योजनेत बदल केले आहेत. आतापर्यंत अकरावी आणि बारावीला पर्यावरणशास्त्र विषयाची ५० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येत होती. या विषयासाठी ३० गुणांची लेखी परीक्षा आणि २० गुणांचा प्रकल्प असे वर्गीकरण करण्यात आले होते. मात्र आता पुन्हा मूल्यांकन प्रणालीत विभागाने बदल केला आहे. त्यानुसार पर्यावरणशास्त्राची लेखी परीक्षा काढून टाकली आहे. त्याऐवजी विद्यार्थ्यांना प्रकल्प आणि प्रकल्प वही किंवा कार्यशाळेत सहभागी व्हावे लागणार आहे. त्यानुसार प्रकल्पाला ३० गुण असतील आणि कार्यशाळा किंवा प्रकल्प वहीसाठी २० गुण निश्चित करण्यात आले आहेत. यासाठी ‘अ’ ते ‘ड’ यापैकी श्रेणी देण्यात येणार आहेत.
जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषयांच्या परीक्षेत सहामाही आणि वार्षिक परीक्षा अशा दोन्ही स्तरांवर ३० गुण प्रात्यक्षिक परीक्षांसाठी असल्याचे यापूर्वीच्या योजनेत नमूद करण्यात आले होते. आता मात्र सहामाहीला प्रात्यक्षिकांची तरतूद रद्द करण्यात आली असून फक्त वार्षिक परीक्षेला प्रात्यक्षिकाचे ३० गुण असणार आहेत. याशिवाय गृहविज्ञान विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यापुढे वस्त्रशास्त्र, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान, गृहव्यवस्थापन, बालविकास यापैकी दोनच विषय घेता येणार आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 12, 2019 1:43 am