क्षयरोगाचे झटपट निदान व्हावे यासाठी मुंबई महापालिकेने घेतलेले धारावीतील ‘जीन एक्स्पर्ट‘ यंत्र एक महिन्यापासून बंद पडले असून त्यामुळे रुग्णांना चाचणीसाठी जेजे रुग्णालय अथवा खासगी रुग्णालयांमध्ये जावे लागत आहे. ‘जीन एक्स्पर्ट’ यंत्रावर अवघ्या दोन तासांत मिळणाऱ्या निदानाच्या अहवालासाठी आठवडाभर किंवा महिनाभर प्रतीक्षा करण्याची वेळ रुग्णांवर आली आहे.
मुंबईमध्ये झपाटय़ाने क्षयाची लागण होत असल्याचे लक्षात येताच पालिकेने मोफत उपचार, रुग्णांचे समुपदेशन सुरू केले. त्याचबरोबर या आजाराचे झटपट निदान व्हावे, यासाठी सहा जीन एक्सपर्ट यंत्रे घेण्याचे ठरवण्यात आले. धारावीमधील अर्बन हेल्थ सेंटर आणि शताब्दी रुग्णालयामध्ये प्रत्येकी एकेक यंत्रे उपलब्ध केली. पटकन निदान होत असल्याने येथे संशयित रुग्णांची रांग लागू लागली. अर्बन हेल्थ सेंटरमध्ये तब्बल ७,५३३ जणांनी चाचण्या करून घेतल्या. त्यापैकी २,०६६ जणांना क्षयरोगाची लागण झाल्याचे आढळून आले. तसेच ६६५ जण एमडीआर क्षयाने ग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले. मात्र,  हे यंत्र महिनाभरापासून बंद पडले असल्याने या चाचणीसाठीची प्रतीक्षा यादी २०० पर्यंत गेली आहे.
हे यंत्र बंद पडल्याने रुग्णांना जेजे रुग्णालय अथवा बडय़ा खासगी रुग्णालयांत जावे लागत आहे. मात्र, येथेही अहवाल येण्यास आठवडा ते महिना उलटत आहे. पालिकेच्या जीन एक्सपर्ट यंत्राद्वारे रुग्णांची विनामूल्य चाचणी करण्यात येते. तर खासगी प्रयोगशाळा अथवा रुग्णालयांमध्ये त्यासाठी १७०० रुपये ते ८००० रुपये खर्च करावे लागत आहेत.