‘माझ्या भावाने केलेल्या गुन्ह्य़ांसाठी मला शिक्षा होत असेल तर हा न्याय मला मान्य आहे. मात्र, मी दोषी आहे असे जर त्यांना वाटत असेल तर ते चूक आहे. मी निर्दोष आहे’, फासावर जाण्यापूर्वी मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील दोषी याकूब मेमन याने गुरुवारी अखेरच्या क्षणी हे वक्तव्य केले. त्यानंतर त्याला फासावर लटकवण्यात आले. फाशीची अंमलबजावणी झाल्यानंतर याकूबचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याकूबच्या मृतदेहावर कडेकोट पोलीस बंदोबस्तात मरिन लाइन्स येथील बडा कब्रस्तान येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी दयेचा अर्ज फेटाळून लावल्यानंतरही याकूबच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात तातडीने याचिका दाखल करून याकूबच्या शिक्षेला आणखी १४ दिवस मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली होती. याकूबच्या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज मध्यरात्रीनंतर अडीच वाजेपर्यंत चालले. सर्व युक्तिवाद तपासून घेतल्यानंतर न्यायालयाने याकूबची फाशीची शिक्षा कायम ठेवली. अखेरीस गुरुवारी सकाळी नागपूर कारागृहात याकूबला फासावर लटकवण्यात आले व या प्रकरणाला मूठमाती देण्यात आली. याकूबला फाशी दिल्यानंतर त्याचा मृतदेह  नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. विमानाने त्याचे नातवाईक  मुंबईत परतले. मृतदेह याकूबच्या माहीम येथील निवासस्थान ‘बिस्मिल्ला मंजिल’ येथे आणण्यात आला. तेथे धार्मिक विधी करून नमाज अदा करण्यात आला. त्यानंतर याकूबची अंत्ययात्रा काढण्यात आली. मरिन लाइन्स येथील बडा कब्रस्तानात याकूबवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी हजारो लोकांनी गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.