मुंबईतील १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटाचा सूत्रधार याकुब मेमन याच्या फाशीच्या दिवसाबाबत एक अजब योगायोग जुळून येताना दिसत आहे. राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी घेतलेल्या निर्णयानूसार याकुबला येत्या ३० जुलै रोजी फाशी देण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ३० जुलै १९६२ रोजी जन्मलेला याकुबला ३० जुलै २०१५ म्हणजे ५३व्या वाढदिवसालाच फाशीच्या शिक्षेला सामोरे जावे लागू शकते. मात्र, अद्यापही याकुबच्या फाशीची तारीख अधिकृतरित्या जाहीर न करण्यात आल्यामुळे या तारखेत बदल होण्याची दाट शक्यता आहे. याकुबला फाशी देताना कारागृहाबाहेर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ३० जुलैआधीही याकुबला फाशी दिली जाऊ शकते. दरम्यान, याबाबत शासनाकडून कोणतेही अधिकृत निवदेन जारी करण्यात आले नसून फाशीच्या या शिक्षेची कार्यवाही कशी होणार याबाबत गुप्तता बाळगण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी याकुबची शिक्षेविरोधातील पुनर्विचार याचिका फेटाळली. यामुळे याकुब मेमनला फाशी देण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे. सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्या नेतृत्त्वाखाली तीन सदस्यीय पीठाने हा निकाल दिला. याकुब मेमनचा चुलत भाऊ उस्मान मेमन याने सर्वोच्च न्यायालयात ही पुनर्विचार याचिका दाखल केली होती.