ओठाच्या गाठीवरील शस्त्रक्रिया यशस्वी

ओठावरील गाठीवरील शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्यानंतर बोरिवलीच्या ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’तील व्याघ्र सफारीत ‘यश’ या नर वाघाचा पुन्हा समावेश करण्यात आला आहे.

अत्यंत रुबाबदार दिसणाऱ्या ‘यश’च्या ओठावर गाठ आली होती. पशुवैद्यकांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करून १२० ग्रॅमची गाठ काढून टाकली आहे. राज्यात वन्य प्राण्यांवर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियांच्या इतिहासात प्रथमच श्वसनाद्वारे भूल देऊन यशवर शस्त्रक्रिया करण्यात आली. गाठीचे निदान झाल्यापासून पर्यटकांना ‘यश’चे दर्शन घडत नव्हते. मात्र आठवडाभराच्या विश्रांतीनंतर यश पुन्हा व्याघ्र सफारीत परतला असून आपली जोडीदार ‘बिजली’ सोबत वेळ घालवीत आहे.

राष्ट्रीय उद्यानातच बसंती वाघिणीच्या पोटी जन्मास आलेला यश गेल्या नऊ  वर्षांपासून येथील व्याघ्र सफारीत नांदत आहे. सध्या सफारीत सात वाघांचे वास्तव्य आहे. यामध्ये यशची वृद्ध आई बसंती, बहीण लक्ष्मी, भाऊ  आनंद यांचा समावेश आहे. तर पेंच व्याघ्र प्रकल्पामधून आणलेल्या बिजली आणि मस्तानी या वाघिणी येथे वास्तव्यास असून बाजीराव नामक वृद्ध पांढरा वाघदेखील आहे. जन्मापासून सुदृढ असलेल्या यशच्या ओठावर जून महिन्यापासून एक गाठ येण्यास सुरुवात झाली होती. तपासणी केल्यानंतर ती ‘ग्रन्युलोमा’ गाठ असल्याचे निदान झाले. गाठ न काढल्यास भविष्यात त्याजागी टय़ुमर निर्माण होण्याची भीती होती. त्यामुळे उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

सुमारे २४० किलो वजनाच्या यशवर शस्त्रक्रिया करण्याचे काम जिकिरीचे असल्याने पशुवैद्यकीय क्षेत्राचा गाढा अनुभव असलेले डॉ. सी.सी.वाकणकर यांना पाचारण करण्यात आले. दोन्ही पशुवैद्यकांनी मिळून १३ ऑगस्ट रोजी यशच्या ओठावर निर्माण झालेल्या गाठीवर शस्त्रक्रिया केली. त्यानंतर आता प्रकृतीत सुधारणा झाल्याने वनाधिकाऱ्यांनी यशला पुन्हा सफारीत सोडले आहे. ओठ आणि जिभेकडे रक्तप्रवाह अधिक असल्याने यशच्या ओठावर निर्माण झालेल्या गाठीवर शस्त्रक्रिया करणे जिकिरीचे काम होते, असे डॉ. शैलेश पेठे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

या शस्त्रक्रियेत प्रथमच गॅस अ‍ॅनास्थेशियाचा वापर करण्यात आला. यात पारंपरिक पद्धतीऐवजी तोंडातून नळीवाटे गॅस अ‍ॅनेस्थेशिया दिला जातो. यशचे वजन आणि शस्त्रक्रियेचा कालावधी पाहता बेशुद्धीसाठी सर्वसामान्यपणे दिल्या जाणाऱ्या भुलीच्या औषधाचा परिणाम त्याच्यावर झाला नसता. यात शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यावरच प्राण्याला शुद्ध येते. राज्यात वन्यप्राण्यांवर प्रथमच या पद्धतीचा वापर करण्यात आला आहे.

– डॉ. शैलेश पेठे, पशुवैद्यकीय अधिकारी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान