एकीकडे खासदारकीच्या शर्यतीत उतरतानाच पालिकेच्या तिजोरीच्या किल्ल्याही हाती ठेवण्याचे राहुल शेवाळे यांचे स्वप्न अखेरच्या क्षणी भंगले. शिवसेनेकडून अधिकृत उमेदवार म्हणून यशोधर फणसे यांनी मंगळवारी निवडणुकीचा अर्ज भरला़ शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून विनोद शेलार अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरले आहेत.
स्थायी समितीचे अध्यक्षपद सलग चार वेळा उपभोगणारे शेवाळे सध्या लोकसभेच्या निवडणुकीत व्यग्र आहेत. तरीही स्थायी समितीचे अध्यक्षपद सोडण्यास ते राजी नव्हते. त्याबाबत पक्षांतर्गत धुसफुस सुरू होती. त्यामुळे अखेर पक्षश्रेष्ठींनी पक्ष कार्यकर्त्यांचा आग्रह मानण्याचे ठरवले. त्यानुसार पालिकेतील सभागृह नेते यशोधर फणसे यांना निवडणुकीचा अर्ज भरण्याचा निरोप ‘मातोश्री’वरून आला. काँग्रेसचे भोमसिंग राठोड यांनीही अध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे. स्थायी समितीमध्ये शिवसेनेचे आठ, भाजपचे पाच, अखिल भारतीय सेनेचा एक, अपक्ष एक, काँग्रेसचे सहा, राष्ट्रवादीचे दोन, मनसेचे तीन व सपाचा एक असे २७ सदस्य आहे. अभासे व अपक्ष सत्ताधाऱ्यांच्या बाजूने असल्याने शिवसेनेने अधिकृतपणे दिलेला उमेदवारच अध्यक्ष म्हणून निवडला जाईल.
शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी विनोद शेलार यांनी भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरला आहे. काँग्रेसच्या प्रियतमा सावंतयादेखील या पदासाठी रिंगणात आहेत.

सभागृहनेतेपदी नगरसेविका
पालिकेच्या सभागृहनेतेपदी वर्णी लावण्यास अनेक नेते उत्सुक आहेत. मात्र नगरसेविकेला हे पद मिळण्याची शक्यता आतील गोटातून व्यक्त होत आहे. तृष्णा विश्वासराव, किशोरी पेडणेकर ही नावे चर्चेत आहेत.