मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर यांचे निधन झालं आहे. ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांनी 13 हून अधिक मराठी चित्रपटांसाठी दिगदर्शन केले होते. नाथा पुरे आता, राजमाता जिजाऊ, लेक लाडकी, हाय कमांड हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते. यशवंत भालकर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्षही होते.

जयप्रभा आणि शालिनी स्टुडिओ वाचवण्यासाठी त्यांनी लढा दिला होता. नुकताच शालिनी स्टुडिओच्या जागेवर बांधकाम करण्यास मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती त्याचा आनंद दोन दिवसांपूर्वीच त्यांनी साजरा केला होता. रंकाळा तलाव वाचवण्यासाठीही त्यांचे मोलाचे योगदान होते.

नुकतंच पार पडलेल्या लोकसत्ता लोकांकिकामध्ये ते सहभागी झाले होते. लोकसत्ता लोकांकिका विभागीय अंतिम फेरीत विजेत्यांना पारितोषिके देण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून ते उपस्थित होते. त्यांच्यासोबत संगीत नाट्य अभ्यासक श्रीकृष्ण लाटकरदेखील होते.

यशवंत भालकर यांची मुलगी सपना जाधव हिने आंतरजातीय विवाह केला होता. त्यावेळी मुलाच्या आईवडिलांनी त्यांना घरातून बाहेर काढले होते .तीन महिन्याचे लहान बाळ घरात ठेवून मुलगी सपना कामावर जात होती .आज त्या मुलीचा स्वतःचा व्यवसाय आहे. पाच कोटींहून अधिक उलाढाल आहे. हा प्रसंग आठवला की भालकर यांच्यातील वडीलहृदय हळवे होत असे.