मुंबई : मुंबईतील महत्त्वाच्या नाटय़गृहांपैकी एक मानले जाणारे अखिल भारतीय नाटय़ परिषदेचे यशवंत नाटय़संकुल लवकरच नव्या रूपात दिसणार असल्याची घोषणा नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. नव्याने उभारण्यात येणारे हे नाटय़संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचे असून अद्ययावत सुविधांनी परिपूर्ण असेल असेही ते म्हणाले.

नाटय़गृहांना दर काही वर्षांनी डागडुजी करून नवी झळाळी द्यावी द्यावी लागते. परंतु डागडुजीवर कोटय़वधींचा खर्च न करता नाटय़संकुलाची नव्याने उभारणी करण्याचा निर्णय सोमवारी परिषदेच्या कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आला. यात केवळ एक रंगमंच नसेल तर व्यावसायिक, प्रायोगिक, बालरंगभूमी याचा विचार करून हे बांधण्यात येणार आहे. नाटक जाणून घेण्यासाठी आलेल्या विदेशी पाहुण्यांसाठीही इथे खास सोय असेल. स्वतंत्र ग्रंथालय आणि नव्या पिढीला नाटय़ प्रशिक्षण घेता येईल याचेही नियोजन नव्या नाटय़गृहात असेल.

परिषदेचे कार्यकारिणी सदस्य अभिनेते राजन भिसे आर्किटेक्ट असल्याने त्यांच्या मार्गदर्शनखाली का प्रकल्प उभारण्यात येईल. ‘टाळेबंदीत नाटय़गृह बंद असल्याने हा वेळ नव्या नाटय़गृहाची बांधणी आणि नियोजनाला देता येईल. जेणेकरून लवकरात लवकर सुसज्ज असे नाटय़गृह तयार होईल. खर्चाचा अद्याप अंदाज आला नसून लवकरच त्याबाबतही स्पष्टता दिली जाईल.’ असे कांबळी यांनी सांगितले.

बोलाविते धनी ओळखावे..

शनिवारी परिषदेचे सहकार्यवाह सतीश लोटके यांनी पत्रकार परिषद घेऊन अध्यक्ष प्रसाद कांबळी व कार्यवाह शरद पोंक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तसेच धर्मादाय आयुक्तांकडे केलेल्या तक्रारींचा पाढाही वाचला होता. ज्यामध्ये कार्यकारिणी बदलाचा अहवाल सदर न करणे, माहितीचा अधिकारी न नेमणे, कर्मचाऱ्यांचे वेतन करोनाकाळात कमी करणे, १०० व्या नाटय़ संमेलन अध्यक्षांची निवड घटनेप्रमाणे न होणे, विश्वस्तांच्या रिक्त जागेबाबत प्रश्नचिन्ह, मुलुंड येथील नाटय़ संमेलनातील आर्थिक गैरव्यवहार असे काही मुद्दे होते. परंतु सोमवारी  पत्रकार परिषदेत  प्रसाद कांबळी यांनी सर्व आरोपांचे खंडन केले. तसेच आमच्या बाजूने सर्व व्यवहारांची पारदर्शकता आहे.  जे आरोप करताहेत त्यांचा आधार  मला माहीत नाही. दोन वर्षांत राज्य पाळतीवर काम करूनही असे आरोप होत  असताना त्यामागचा ‘बोलविता धनी’ कुणी वेगळा आहे का, अशी प्रतिक्रिया कांबळी यांनी दिली. असे असले तरी १४ ऑक्टोबरला होणाऱ्या धर्मादाय आयुक्तांच्या सुनावणीत योग्य बाजू समोर येईल.

हौशी रंगकर्मीना मदतीचा हात

सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून आयोजित केल्या जाणाऱ्या हौशी राज्य नाटय़ स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धक संघांना शासनाकडून दिला जाणारा भत्ता यंदा रखडल्याने हौशी रंगकर्मी आर्थिक विवंचनेत आहेत. त्यामुळे त्यांना दिलासा म्हणून प्रत्येक संघाला प्रत्येकी सहा हजार रुपये मदतनिधी देण्याचा निर्णयही या कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आला. यंदाच्या स्पर्धेत राज्यभरातून एकूण ४०० हून अधिक संघ सहभागी झाले होते. त्या सर्व संघांना स्पर्धेत सहभागी झाल्याचे पुरावे आणि बँकेचे तपशील नाटय़ परिषदेपर्यंत पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. natyaparishad.org@gmail.com या ईमेल पत्त्यावर संघांनी अर्ज करावयाचा आहे.