नवीन वर्षांसाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. जुन्या वर्षांला निरोप देताना नव्या वर्षांत काय चांगले आहे हे जाणून घेण्याची सगळ्यांनाच उत्सुकता असते. नूतन वर्ष हे नोकरदार वर्गासाठी सुट्टय़ांची पर्वणी घेऊन आल्याची माहिती पंचांगकर्ते खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली आहे.
या वर्षीचा पहिला मकरसंक्रांतीचा सण १५ जानेवारीला आहे. त्यानंतर, १७ जून ते १६ जुलै २०१५ या कालावधीत आषाढ अधिक मास आल्याने नागपंचमी, गणेशचतुर्थी, दसरा, दिवाळी हे सण २० दिवस उशिरा येणार असल्याचे सोमण यांनी म्हटले आहे. या वर्षीचा महत्त्वाचा योग म्हणजे दर १२ वर्षांंनी एकदाच येणारा सिंहस्थ कुंभमेळा. १४ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान गुरू सिंह राशीत येणार असल्याने कुंभमेळ्याचा योग जुळून आला आहे. नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा भरणार आहे. सिंहस्थ असल्याने पुढील वर्षभर विवाह मुहूर्त नाहीत, अशी अफवा पसरली होती. त्यात तथ्य नसल्याचे सोमण यांनी स्पष्ट के ले. सिंह नवमांश काळात विवाहाचे मुहूर्त नसतात. या वर्षी या काळात चातुर्मास येणार असल्याने जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे चार महिने वगळता सर्व आठ महिन्यांत विवाहाचे मुहूर्त आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

२०१५ मध्ये आलेल्या २५ सुट्टय़ांपैकी २४ सुट्टय़ा विनाअडथळा मिळणार आहेत. एकच सुट्टी रविवारी आली आहे तर पाच सुट्टय़ा शनिवार-रविवारजोडून आणि दोन सुट्टय़ा रविवार-सोमवार अशा जोडून येणार असल्याने नोकरदारवर्गासाठी हे वर्ष ‘सुट्टी’दायक असणार आहे.