कॅन्सर पेशंट एड असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष वाय. के. सप्रू यांना सार्क राष्ट्रांकडून आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत गौरवण्यात आले. कर्करोगाची जागृती, प्रतिबंध तसेच लवकर निदान करण्यासंबंधी ही परिषद दिल्ली येथे नुकतीच भरली होती. सप्रू यांनी १९६९ मध्ये सुरू केलेल्या संस्थेद्वारे गेल्या ४७ वर्षांत लाखो गरीब रुग्णांच्या उपचार व पुनर्वसनाचे कार्य अविरतपणे सुरू आहे. मुंबई, नवी दिल्ली आणि पुणे येथील संस्थेच्या कार्यालयाद्वारे सर्वसामान्यांमध्ये कर्करोगाविषयी जागृती, संशोधनाची माहिती, लवकर निदान, रुग्णांच्या उपचारांसाठी लागणारी मदत आदी स्वरूपात कर्करोग रुग्णालय, डॉक्टर यांच्यासाठी साहाय्यक यंत्रणा उभी करण्यात आली. संस्थेचा खर्च हा केवळ वैयक्तिक व कॉर्पोरेट देणग्यांमधून केला जातो. एवढय़ा वर्षांच्या अनुभवानंतर आता सीपीएए या क्षेत्रात काम करणाऱ्या इतर संस्थांनाही मार्गदर्शन करत आहे. औषधनिर्माण कंपनीमध्ये कामाला सुरुवात करून १९९९ मध्ये कार्यकारी संचालकपदावरून निवृत्त झालेल्या वाय. के. सप्रू यांच्या कार्याप्रति असलेल्या समर्पण वृत्तीमुळे या संस्थेतील प्रत्येकाला आपुलकी वाटते.