मुंबईत शनिवारी मेघगर्जनेसह आगमन झालेल्या पावसाने दादरमधील एका तरुणाचा बळी घेतला. दादर समुद्रकिनाऱ्यावर सकाळी मोबाइलवर बोलताना ढगांच्या प्रचंड गडगडाटामुळे घाबरून कोसळलेल्या तरुणाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेल्या मित्रालाही प्रचंड मानसिक धक्का बसला असून, त्याला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दादरमधील एस. के. बोले मार्गावरील कलकत्तावाला चाळीत राहणारा ओंकार गणपत बेंडल हा भाऊ आणि मित्रासोबत सकाळी वृत्तपत्र वितरणाचे काम करतो. काम आटोपल्यानंतर शनिवारी सकाळी आठ-साडेआठच्या सुमारास हे तिघे कीर्ती महाविद्यालयाजवळ समुद्रकिनाऱ्यावर गेले होते. ओंकार मोबाइलवर बोलत असतानाच अचानक ढगांच्या गडगडाटाचा प्रचंड आवाज झाला आणि त्याचक्षणी ओंकार आणि त्याचा मित्र दर्शन येरमकर खाली कोसळले. आवाजाची तीव्रता प्रचंड असल्यामुळे हे दोघेही घाबरले होते.
ओंकारला हृदयविकाराचा झटका आला. ओंकार आणि दर्शन पडल्याचे पाहताच त्याचा भाऊ प्रचंड घाबरला. जवळच असलेल्या तटरक्षक दलाच्या जवानांनी ओंकार आणि दर्शनला तात्काळ खासगी रुग्णालयात नेले. तेथून त्यांना केईएम रुग्णालयात नेण्यात आले.
रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच ओंकारचा मृत्यू झाला, तर दर्शनवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ओंकारच्या पार्थिवावर दादरच्या स्मशानभूमीत शनिवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.