इंटरनेटची वायर टाकताना अपघात; हार्बर मार्गावरील वाहतुकीचा २० मिनिटे खोळंबा

हार्बर मार्गावरील रावळी जंक्शन मध्य रेल्वेसाठी मोठी डोकेदुखी ठरत असून रविवारी संध्याकाळी या ठिकाणी इंटरनेटची वायर टाकण्यासाठी रेल्वेच्या खांबावर चढलेला तरुण ओव्हरहेड वायरच्या संपर्कात आल्याची घटना घडली. त्याला विजेचा झटका बसला असून त्यात तो गंभीर जखमी झाला आहे. ओव्हरहेड वायर इंटरनेट वायरच्या संपर्कात आल्यामुळे मध्य रेल्वेच्या ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला. त्यामुळे सिग्नल यंत्रणेतील १५ फ्यूज जळल्याने सिग्नल यंत्रणा निकामी झाली. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी मध्य रेल्वेला अध्र्या तासापेक्षा जास्त वेळ लागला. परिणामी रविवारी संध्याकाळी हार्बर मार्गावरील प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.

हारिस सुलेमान नायक (वय २६)  असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. वडाळा रोड स्थानकाजवळील रावली जंक्शन येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड होणे, मालगाडीचे इंजिन बंद पडणे आदी अनेक बिघाड सातत्याने होतात. त्यामुळे हे जंक्शन मध्य रेल्वेसाठी डोकेदुखीचे ठरले आहे. गेल्या रविवारी या ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीतील काहींनी सिग्नल यंत्रणेजवळ कचरा जाळल्याने सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता. या रविवारीही याच ठिकाणी पुन्हा एकदा सिग्नल यंत्रणा कोलमडली.

या मार्गाजवळील वस्त्यांमध्ये इंटरनेटची जोडणी देण्यासाठी संध्याकाळी दोन जण रेल्वे मार्गावरील खांबावर चढले होते. तेथून इंटरनेटसाठीची वायर टाकण्याचे काम करत असताना या वायरचा आणि खांबावर चढलेल्या एका व्यक्तीचा संपर्क ओव्हरहेड वायरच्या ट्रान्सफॉर्मरशी आला. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन संबंधित व्यक्ती खांबावरून खाली फेकली गेली. या माणसाला त्याच्याबरोबर असलेल्या दुसऱ्या माणसाने तातडीने शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केले. या व्यक्तीबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

दरम्यान, ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाल्याने विद्युत पुरवठय़ात अनियमितपणा आला आणि त्यामुळे सिग्नल यंत्रणेतील १५ फ्यूज जळून खाक झाले. त्यामुळे हार्बर मार्गावरील सिग्नल यंत्रणा पूर्णपणे कोलमडली. तब्बल २० ते २५ मिनिटे सिग्नल यंत्रणा काम करत नसल्याने या मार्गावरील गाडय़ा जागीच उभ्या राहिल्या. अखेर अध्र्या तासानंतर हे फ्यूज बदलून सेवा चालू करण्यात आल्या. मात्र त्यामुळे ठिकठिकाणी प्रवाशांचा खोळंबा झाला.