News Flash

‘बालक-पालक’च्या तिकिटाच्या वादातून तरुणाचा खून

‘बालक-पालक’ या चित्रपटाच्या तिकिटाच्या वादातून लालबाग येथील भारतमाता चित्रपटगृहाच्या आवारात सोमवारी एका १९ वर्षे वयाच्या तरुणाचा नारळ कापण्याच्या धारदार कोयत्याने दिवसाढवळ्या निर्घृण खून करण्यात आला.

| January 15, 2013 03:32 am

‘बालक-पालक’ या चित्रपटाच्या तिकिटाच्या वादातून लालबाग येथील भारतमाता चित्रपटगृहाच्या आवारात सोमवारी एका १९ वर्षे वयाच्या तरुणाचा नारळ कापण्याच्या धारदार कोयत्याने दिवसाढवळ्या निर्घृण खून करण्यात आला. यानंतर पळून गेलेल्या ६० वर्षे वयाच्या इसमाला वाहतूक पोलिसांनी  राखून अटक केली. अजय खामकर असे या मृत तरुणाचे नाव असून तो करी रोड येथील हरळवाला इमारतीत राहत होता. त्याला एक लहान भाऊ असून आईवडील गावी असतात. चर्चगेट येथील आयडीबीआय बँकेत तो पॅकेजिंगचे काम करीत होता. तो ‘बालक-पालक’ चित्रपट पाहण्यासाठी दोनच्या सुमारास भारतमाता चित्रपटगृहात गेला. मकरसंक्रांतीचा सुटीचा दिवस असल्याने तिकिटासाठी भली मोठी रांग होती. त्याच वेळी तेथे आलेला अशोक चव्हाण (६०) हा इसम रांगेत मध्येच घुसला. त्यामुळे अजयने त्याला जाब विचारला. त्या वेळी दोघांमध्ये हाणामारी झाली. त्याचा राग मनात ठेवून समोरच्या नारळाच्या दुकानात तो गेला. नारळ फोडण्याचा कोयता हातात घेऊन तो पुन्हा तेथे आला आणि रांगेत असलेल्या अजयच्या जवळ जाऊन त्याने कोयत्याने वर्मी वार केला. अजयला लगेचच केईएम रुग्णालयात नेण्यात आले; परंतु रक्तस्रावाने त्याचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला.
या घटनेनंतर इतर प्रेक्षकांनी लगेचच चव्हाणला पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र तो कसाबसा पळून जाण्यात यशस्वी ठरला. लालबाग जंक्शन येथे डय़ुटीवर असलेल्या नवनाथ घाटे आणि लहू साळवे या वाहतूक पोलिसांना तोपर्यंत या प्रकाराची माहिती मिळाली होती.  लालबाग मार्केटजवळील जिजीभाई लेनमध्ये त्याला  या दोन्ही पोलिसांनी पकडले. त्याला भोईवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. घाटकोपरच्या भटवाडी परिसरात राहणाऱ्या चव्हाणचे लालबाग मार्केटमध्ये नारळाचे दुकान आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2013 3:32 am

Web Title: young boy murdered at bharmata theater
Next Stories
1 ट्रान्स हार्बरवर रात्री उशिरापर्यंत गाडय़ा उपलब्ध होणार
2 बिरजू महाराजांच्या कथ्थकमुळे रसिकजन थक्क !
3 साहित्य संमेलनाची राजकीय धुळवड!
Just Now!
X